प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

आठवडा विशेष टीम―




मुंबई, दि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून  ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, केंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावी, असे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींग, सोसायटी मिटींग, जेष्ठ नागरिकांचे क्लब, झोपडपट्ट्या तसेच शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धती, सुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेत, असे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

 







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button