जी-२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २३; जी -२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी सदस्यांनी ढोल ताशे आणि लेझीमच्या संगीतावर ताल धरत आनंद घेतला. गेट वे ऑफ इंडिया येथे जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या विविध देशातील मान्यवर प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार उपस्थित होत्या.

जी-२० देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. त्याचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-२० देशांच्या कार्यगटांच्या बैठका होत आहेत. त्यातील ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत आजपासून सुरू झाली आहे. सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत.

10 1

या प्रतिनिधींसाठी आज सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी  लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

कठपुतली, लाईव्ह पेंटींग यासह राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करणारा भव्य असा लाईट ॲन्ड साउंड शो सादर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वातंत्र्य चळवळीतील राज्याचे योगदान आणि आतापर्यंत झालेला राज्याचा देदिप्यमान प्रवास असे विविध टप्पे असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित प्रतिनिधींनी उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली.

हा कार्यक्रम राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि केंद्राच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सादर केला गेला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.