नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 25 : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला आमदार आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, मुंबई महानगर पालिकेचे उपयुक्त रमाकांत बिरादार, मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी रवी कट्टकधोंड, आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागाकडून यावर्षीही गणेशोत्सवात स्पर्धा घेण्यात येतील. यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी बैठक घेतलेली आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार चार फुटाच्या आतील गणपती मूर्ती मातीच्या व चार फुटावरील मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा मातीच्या बनविण्यात याव्यात. त्याबाबत न्यायालयाने दिलेले निर्देश पाळावेत. याबाबत मूर्तीकार बांधवांची पर्यावरण विभागासोबत बैठक घेण्यात येईल. महापालिकेने मूर्ती बनविणे, मूर्तींचे विसर्जन, मूर्तीकारांना देण्यात येणारी जागा याबाबत सुलभ कार्यप्रणाली तयार करावी. ध्वनी क्षेपकाव्यतिरिक्त रात्री १० वाजेनंतर मंडपात करण्यात येणाऱ्या गणपती आरत्यांना परवानगी बाबत सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. या प्रकरणात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत पोलीस विभागाने दक्ष असावे. त्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा. महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी विविध परवानग्या देण्यासाठी ‘एक खिडकी योजने’ची अंमलबजावणी करावी, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

बैठकीला पोलीस, महापालिका, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी व मूर्तिकार बांधव उपस्थित होते.

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.