चिपळूणसह जिल्हात खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १९ : कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी  गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे,  या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती  व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार शेखर निकम देखिल उपस्थित होते.

राज्यात पावासाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून  वाढला आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, तसेच वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वशिष्ठीचे पाणी धोकापातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरामुळे बाधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. दोन वर्षापूर्वी वाशिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहिती सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.