Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.०६ – पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी वळवली येथील शासकीय जमिनीवरील आदिवासी बांधवांचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मंत्रालयात झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वळवली येथील सर्व्हे क्र.४९/०, खाते क्र.११२ मधील ४७.४४ हेक्टर शासकीय जमीन आदिवासी बांधव पूर्वजांपासून कसत आहेत. गावातील आदिवासी बांधवांचे हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याचे आदेश महसूल विभागाने यापूर्वी काढले आहेत. वळवली गाव सिडकोच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने महसूल विभागाने सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सिडकोकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव सिडकोमार्फत अंतिम मंजूरीसाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या अंतिम मंजूरीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत यावेळी चर्चा केली.
000