आठवडा विशेष टीम―
नागपूर, दि. २२: लोकमत माध्यम समूहाद्वारे आयोजित सूर जोत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर यांना लिजंड अवॉर्ड, प्रख्यात गझल गायक तलत अझीझ यांना आयकॉन अवॉर्ड, शास्त्रीय गायक अनिरुद्ध ऐथल तसेच अंतरा नंदी आणि अंकिता नंदी यांना उदयोन्मुख प्रतिभा पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना भारतीय संगीताच्या क्षेत्रात आज नवीन पिढी अत्यंत सक्षमपणे पुढे येत असल्याचा अभिमान आहे. राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरविण्यात आलेले उदयोन्मुख कलावंत नावलौकिक मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.
पुरस्कार वितरणानंतर उस्ताद शुजात हुसेन खान आणि ग्रुप यांनी सुफी गायन व सितारवादनाची प्रस्तुती सादर केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
०००