प्रशासकीयब्रेकिंग न्युज

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आली ‘आनंदाची बस’

आठवडा विशेष टीम―





मुंबई, दि. २३: राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्हा हा अविकसित, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याची ही ओळख पुसण्यासाठी जोमाने विकास कामे सुरू केली आहेत. येथील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणून विकासाची फळे चाखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने विकास कामे करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी गावासाठी गावकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. या बस फेऱ्यांमुळे संबंधित गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून ही बस त्यांच्यासाठी निश्चितच ‘आनंदाची बस’ ठरली आहे.

या गावातील नागरिकांनी रुग्ण, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांच्या सोयीसाठी बस सुरू करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची संवेदनशील व्यक्तिमत्व असलेल्या तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय नियंत्रक यांना बस सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार धानोरा तालुक्यातील मौजा मुरूमगाव, पेंढरी व रांगी गावात तसेच या गावाच्या मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. बस फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.

राज्य परिवहन गडचिरोली विभागातील धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे ०३ नियतांमार्फत १० फेऱ्या, पेंढरीकरीता ०३ नियतांमार्फत ०८ फेऱ्या व रांगीकरीता ०२ नियतांमार्फत ०६ फेऱ्या सुरू आहेत. मुरूमगाव येथून दैनंदिन २८५, पेंढरी येथून दैनंदिन ३३५ व रांगी येथून दैनंदिन २४२ प्रवासी प्रवास करतात. बस फेऱ्या सुरू झाल्यामुळे संपूर्ण आदिवासी असलेल्या या गावातील आदिवासी बांधवांची मोठी सोय झाली आहे. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठी, दवाखान्यासाठी जाणे सोयीचे झाले आहे. ही गावे गडचिरोली सारख्या शेवटच्या जिल्ह्यातील शेवटच्या टोकाची गावे आहे. या गावातून ९ किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्य आहे. अशा अतिदुर्गम भागातील गावकऱ्यांची सोय या बस फेऱ्यांमुळे झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवून मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मागील काही दिवसात अती दुर्गम भागात मुख्यमंत्री यांनी स्वतः बसमध्ये प्रवास करून गडचिरोली आता नक्षलग्रस्त नाही, तर विकासाच्या मार्गावर गतीने धावणार असल्याचे दाखवून दिले आहे.

0000







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button