बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

परळी माझी पंढरी, पंढरीची सेवा हाच ध्यास―पंकजाताई मुंडे

परळी शहरात १८ लाख ७४ हजार रुपयांचा रस्त्यांचे लोकार्पण करत दिला परळीकरांना विश्वास

परळी दि.१३: आठवडा विशेष टीम―परळी ही माझी जन्म आणि कर्मभूमी आहे, तुमची लेक राज्याची मंत्री असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या परळीच्या लेकीच्या हातात आहेत. परळी ही माझी पंढरी असून पंढरीची सेवा करणे हा माझा ध्यास आहे. जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असून आज या लोकार्पण कार्यक्रमाच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे औचित्य साधत माझी पंढरी असलेल्या जनतेच्या दर्शनासाठी आले असल्याची भावना राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.

परळी शहरातील माणिक नगर , शिवाजी नगर भागातील विशेष रस्ता अनुदान निधी अंतर्गत दिलेल्या पाच कोटी रुपयांपैकी १८.७४ लक्ष रुपयांच्या रस्त्यांचे लोकार्पण पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ना.पंकजाताई मुंडे बोलत होत्या.

पुढे बोलताना ना.पंकजाताई मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान समृद्ध होत आहे. रस्ते ,पाणी पुरवठा ,महिला बचत गट अशा अनेक योजना ग्रामीण भागात यशस्वीपणे राबवून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणारे कार्य सत्तेच्या माध्यमातून केले आहे. परळी नगर परिषद आमच्या ताब्यात नाही.नगर परिषद माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी होती. ज्या राष्ट्रवादीच्या ताब्यात नगर परिषद आहे त्यांनी पाणी पुरवठा योजनेचा बट्याबोळ केला असून भ्रष्टाचार करण्याची कला राष्ट्रवादीकडे असल्याची टीका ना.पंकजाताई मुंडे यांनी केली.

नगर परिषद आपल्या ताब्यात नसल्याने शहराचा विकासात अडथळा येत असल्या तरी परळीच्या विकासात आपण कमी पडणार नाही. तुमच्याशिवाय माझे कुणी नसून सदैव तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असा विश्वास यावेळी त्यांनी उपस्थितांना दिला.

पाण्यात भेदभाव करणारांना पाणी पाजवू

शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. परळीकरांची तहान भागवण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी शहराच्या विविध भागात बोअर घेऊन दिले.परंतु नगर परिषद ताब्यात असलेली राष्ट्रवादी पाणी वाटपात भेदभाव करत आहे. शत्रूलाही पाणी पाजण्याची परंपरा आपल्या संस्कृतीची आहे.परंतु राष्ट्रवादीकडून पाणी वाटपात होणारा दुजाभाव बघता येणाऱ्या काळात पाणी वाटपात भेदभाव करणारांना पाणी पाजवू असा विश्वास ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी माणिक नगर ,शिवाजी नगर भागातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात ना.पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमास चनबस आप्पा गिरवलकर, दत्ताप्पा इटके, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, विकासराव डुबे, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, रिपाइंचे नेते धम्मानंद मुंडे, वैजनाथ जगतकर, दत्ता कुलकर्णी, उमेश खाडे, मोहन जोशी, अरुण पाठक, अनिष अग्रवाल,सचिन गित्ते, नितीन समशेट्टी,अश्विन मोगरकर,प्रल्हाद सुरवसे,अभिजीत धाकपाडे, वैजनाथ रेकने, ताजु मामु, नेहरकर,श्रीपाद शिंदे,गणेश होळंबे,पुरबुज मॅडम ,माणिक नगर येथील नागनाथ शंकूरवार, गवते मामा,वीरभद्र काळे,माधव रामदिनवार,सतीश किलचे सर,दशरथ सूत्रावे, अशोक नावंदे सर,दत्ता म्हाळगी,रमेश मुंडे आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते. ना. पंकजाताई मुंडे यांचे स्वागत आयोजक राजाभाऊ दहिवाळ, योगेश पांडकर,विजय दहिवाळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक पवन मुंडे, संचलन अनंत मुंडे यांनी केले तर योगेश पांडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.