प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते  ‘मु. पो. तालकटोरा’ पुस्तकाचे प्रकाशन

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि. १७: ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वागताध्यक्ष तथा जेष्ठ नेते शरद पवार व अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांची संमेलनातील भाषणे संग्रही ठेवण्याच्या उद्देशाने जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार संपादित ‘मु. पो. तालकटोरा’ या पुस्तकाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात आले.

यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीता पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार, सरहद संस्थेचे संजय नहार आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. भोसले म्हणाले,  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानाची बाब आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मोठे योगदान आहे. यात सातारच्या शाहूपुरी शाखेचा महत्त्वाचा वाटा आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठीच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे असे सांगून सातारा जिल्ह्याची साहित्य व कला क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. नुकतेच साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या प्रयत्नातून बा. सी. मर्ढेकरांच्या निवासस्थानाचे  नूतनीकरण करण्यात आले असून सुंदर वास्तू उभारण्यात आल्याचे सांगितले.

ते म्हणाले, महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. दिल्लीतील मराठी माणसांना महाराष्ट्र सदनमध्ये प्रवेश मिळण्यासाठीही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगून ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे घेण्यात यावे, असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी दिल्ली येथे २०१८ मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेले सातारचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जेष्ठ पत्रकार रविंद बेडकिहाळ, राजन लाके, दैनिक पुढारी प्रमुख हरिष पाटणे, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, फिरोज पठाण, राजेश जोशी, संतोष यादव, गजानन पारखे, शेखर मोरे पाटील, राजू गोरे, अजित साळुंखे, अमर बेंद्रे, रोहित वाकडे, विशाल कदम, अक्षय जाधव, सचिन सावंत, सतीश घोरपडे, सोमनाथ पवार, राजेंद्र जगताप, वैभव पवार, वजीर नदाफ यांचा मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, श्रीराम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध माध्यमातून योगदान देणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी तर शैलेश पगारिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button