आठवडा विशेष टीम―
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (विमाका) : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रीयल रिंगरोड तयार करुन, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्लस्टरसाठी 5 एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र उभारताना व्यवहार्य तूट भरुन काढण्यासाठी शासन निधी देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एमआयटी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर तर्फे आयोजित ‘उद्योग पुरस्कार 2025’ च्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विशेष आमंत्रित पाहुणे एन्ड्यूरन्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग जैन, सीएमआयचे अध्यक्ष अर्पित सावे, सचिव अथर्वेशराज नंदावत, सीएमआयचे माजी अध्यक्ष राम भोगले आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर मॅन्युफॅक्चरींग मॅग्नेट
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याचे पुढचे मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर -जालना आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले इंडस्ट्रीयल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर (औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र) उभारण्यात येईल. हे केंद्र चालविण्यासाठी अनुभवी संस्थेस दिले जाईल. त्यातील व्यवहार्य तूट शासन निधी देऊन भरुन काढेल. केंद्र सरकारच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीतील उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे. तसेच, चाळीसगाव – संभाजीनगर रेल्वे बोगद्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार असून, भूसंपादनाची कार्यवाही केली जाईल.
जायकवाडी धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मितीसाठीही विविध प्रकल्प आणले जात आहेत. त्यात प्रामुख्याने देशातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प जायकवाडी धरणावर उभारण्यात येणार आहे. काही परवानग्या मिळाल्या असून, उर्वरित परवानग्या मिळाल्यानंतर काम सुरू होईल. दिल्ली-मुंबई (डीएमआयसी) कॉरीडॉरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे तयार करण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून देशातील पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीही छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यात आली आहे. आता या कॅरिडॉरमध्ये आता जागा शिल्लक नसून आता आणखी ८ हजार एकर जमीनीचे संपादन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण देशात ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) उत्पादनात मोठा हिस्सा छत्रपती संभाजीनगरचा असणार आहे. येथील ईव्ही क्लस्टरच्या विकासाला चालना दिली जाणार आहे.
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे. 50 टीएमसी पाणी विविध प्रकल्पांद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल. यामाध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर व सांगलीतील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे 30 टीएमसी पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविण्याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, नागपूरहून गोव्यापर्यंत असलेला शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून जाणार असून हा महामार्ग मराठवाड्यातील उद्योगांसाठी जीवन वाहिनी ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना तसेच उद्योगांना चालना मिळेल. जेएनपीटी पोर्टच्या तीनपट मोठे बंदर वाढवण येथे उभारण्यात येत आहे. या पोर्टला नाशिक येथे जोडण्यात येणार असून यामुळे छत्रपती संभाजीनगरहून या वाढवण पोर्टला सहा ते आठ तासात मालवाहू कंटेनर पोहचणार आहेत. याचा मोठा फायदा निर्यातदार उद्योगांना होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
अनुराग जैन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात औद्योगिक विकासाला गती मिळाली. शेंद्रा-बिडकीन वसाहत, विमानतळ विस्तार, जालना ड्रायपोर्ट आणि समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांनी जागतिक उद्योग व नवउद्योजकांना आकर्षित केले. त्यामुळे रोजगार व आर्थिक विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग आणि पर्यटन वाढीस मोठी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्पित सावे यांनी, मराठवाडा विभागातील औद्योगिक वाढीच्या गुंतवणूक संधी व दिशा” याविषयावर सादरीकरण केले. छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या सोयी- सुविधांबाबत राम भोगले यांनी मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा व्यक्त केल्या.
याप्रसंगी मराठवाडा प्रदेशातील आर्थिक विकास, नवोपक्रम आणि उद्योजकतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ग्राहक अभिमुखता, अभिनव उत्पादन, उद्योग ४.०, पर्यावरण जागरूकता, एचआर चॅम्पियन, उद्योजक (वैयक्तिक) आणि जागतिक लघु व मध्यम उद्योग या श्रेणींमध्ये, उद्योगाच्या आकारानुसार सूक्ष्म, लहान, मध्यम आणि मोठे उद्योग विभागांमध्ये विविध उद्योजकांना तर ग्लोबल एसएमई पुरस्कार प्रॅक्टीक प्रा. लि. यांना देण्यात आला.
०००