प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

आठवडा विशेष टीम―

▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’

जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी घोडगांव (ता. चोपडा) येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे होते. या वेळी जिल्ह्यातील २८ शहीद जवानांच्या स्मारकांसाठी शासनाची मान्यता घेवून लवकरच DPDC निधी मंजूर करून भव्य स्मारके उभारण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली. या भावनिक प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. ‘जय हिंद’ च्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात शूर जवानाला अभिमानाने मानवंदना देण्यात आली.

पालकमंत्र्यांचे गौरवोद्गार !

“सुनील पाटील फक्त शेतकऱ्याचा मुलगा नव्हता, तर तो मातृभूमीचा सच्चा शूरवीर होता. त्याच्या शौर्याचे हे स्मारक पुढच्या पिढ्यांना देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश देत राहील,” असे उद्गार पालकमंत्री पाटील यांनी काढले.

गौरव सलामीचा अभिमान

या वेळी शहीद जवानाच्या पुतळ्याला ‘ गौरव सलामी’ देण्यात आली. ही एक सशस्त्र व शिस्तबद्ध सन्मान परंपरा असून, ती विशिष्ट शूरवीर, मान्यवर किंवा शहीद यांच्यासाठी दिली जाते. 44 वी वाहिनी भारत-तिब्बत सीमा पोलिस बल, बेळगांव (कर्नाटक) येथून आलेल्या पथकाने ही सलामी दिली.

शहिदाच्या कुटुंबासाठी मदतीचा हात

या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील  व आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने शहीद जवानाच्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत  माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.

‘जय हिंद’च्या गजरात नमन

सिंदूर ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या जवानांना सन्मानपूर्वक सलाम करण्यात आला. आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणाले, “सुनील पाटील यांनी ‘माझा देश हाच माझा प्राण’ ही भावना मनाशी ठेवून सेवा बजावली. त्यांच्या बलिदानामागे त्यांचे कुटुंब हे खरे नायक आहे.”

पार्श्वभूमी – वीर जवान सुनील पाटील यांचे शौर्य

सुनील पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी घोडगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण सौंदाणे येथे झाले. माध्यमिक शिक्षण वडजाई व घोडगाव येथे पूर्ण करून त्यांनी SSVPS, धुळे येथून बी.ए. पदवी घेतली. २००९ मध्ये ITBP मध्ये भरती झाल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. २०२१ पासून मणिपूरमधील मोइरंग येथे तैनात होते. ५ ऑगस्ट २०२४ रोजी तेथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण प्राप्त केले.

उपस्थित मान्यवर व कुटुंबीय

या प्रसंगी माजी आमदार लता सोनवणे, शहीद जवान सुनील पाटील यांचे कुटुंबीय – आई मल्लिकाबाई, पत्नी पुनम, मुलगी समृद्धी, आजोबा प्रभाकर, चुलत भाऊ कैलास पाटील, जवान निरीक्षक संजय कुमार, सत्यम मलिक, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उद्योगपती प्रकाश बाविस्कर, मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, माजी जि.प. सदस्य हरीश पाटील, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, विकी सनेर, एम. व्ही. पाटील, ॲड. शिवराज पाटील, किरण देवराज, सुनील पाटील, कांतीलाल पाटील, पिंटू पावरा, अंबादास सिसोदिया, योगराज बडगुजर यांच्यासह ग्रामस्थ नागरिक विद्यार्थी, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहीद जवानाच्या त्याग, कुटुंबाचे धैर्य आणि देशप्रेमाची साक्ष देणारा हा कार्यक्रम प्रत्येक उपस्थिताच्या अंत:करणावर अमिट छाप उमटवणारा ठरला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button