प्रशासकीयब्रेकिंग न्युज

घरच्या घरी पहा बियाण्याची उगवणक्षमता…!!

आठवडा विशेष टीम―

खरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी बियाण्याची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो. अनेकदा शेतकरी बांधव दरवर्षी बाजारातून नवे बियाणे खरेदी करतात. परंतु, हे बियाणे महाग असतानाही त्याची उगवणक्षमता कितपत योग्य आहे, हे निश्चित नसते. अशा वेळी वेळ, श्रम आणि पैसा वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळेच ‘उगवणक्षम बियाणं’ वापरणे हा खरीप यशस्वी करण्याचा मूलमंत्र ठरतो.

या लेखातून आपण बियाण्याची उगवणक्षमता का तपासावी, त्याचे फायदे काय आहेत, आणि घरच्या घरी ती कशी तपासायची याबाबतच्या सोप्या आणि वैज्ञानिक पद्धती  जाणून घेणार आहोत. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाच्या सौजन्याने ही माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत…!!

दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे का?

अनेक शेतकरी बांधवांचा समज असतो की प्रत्येक वर्षी नवीन बियाणे बाजारातून विकत घेऊनच पेरणी करावी. मात्र, सोयाबीन, मूग, उडीद, गहू, चवळी, भुईमूग यांसारखी पिकं स्वपरागसिंचीत (self-pollinated) असल्यामुळे त्यामध्ये संकरीत वाणांचा प्रश्न नसतो. त्यामुळे एकदा प्रमाणित बियाणे विकत घेतल्यावर त्यापासून तयार झालेल्या पिकाचे बियाणे पुढील दोन वर्षे वापरता येते.

यामुळे दरवर्षी नवीन बियाण्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो. पण हे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता (germination capacity) तपासणे अत्यावश्यक असते.

बाजारातील बियाण्यांवर अवलंबून राहणे का धोकादायक ठरते?

कधीकधी विकत घेतलेले बियाणे उगवत नाही. अशावेळी शेतकरी बांधवांनी खते, मेहनत, वेळ आणि पैसा खर्च केलेला असतो. पेरणी कालावधीही निघून जातो. नंतर लेखी तक्रार, पंचनामे, नुकसानभरपाईसाठी प्रयत्न यामुळे मानसिक व आर्थिक त्रास होतो.

यावर उपाय म्हणजे— बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करणे. ही तपासणी आपण घरी सहज करू शकतो.

उगवणक्षमता तपासणीच्या तीन सोप्या पद्धती

गोणपाट वापरून तपासणी :

प्रत्येक पोत्यातून थोडे बियाणे घेऊन एकत्र करा. १०० दाण्यांचे ३ नमुने तयार करा. ओल्या गोणपाटावर दाणे १०-१० च्या रांगेत लावा.वरून दुसरा ओला गोणपाट घाला आणि गुंडाळी करून सावलीत ठेवा. ६-७ दिवसांनी उगवलेले दाणे मोजा.७०% किंवा त्यापेक्षा अधिक उगवणक्षमता असल्यास बियाणे योग्य.

रद्दी पेपर वापरून तपासणी:

रद्दी पेपरला चार घड्या घालून ओले करा. प्रत्येकी १० बियांच्या १० ओळी तयार करा (एकूण १०० बिया).गुंडाळ्या करून पिशवीत ठेवा.दिवसांनी अंकुर आलेल्या बिया मोजा. ७०% किंवा अधिक बिया उगवल्यास बियाणे योग्य समजावे.

पाण्यात भिजवून त्वरीत तपासणी:

१०० दाण्यांचे ३ संच तयार करा.५-७ मिनिटे पाण्यात ठेवा.टरफल सुरकुतलेले/फुगलेले दाणे वगळा. फुगलेले दाणे – खराब. टरफल शाबूत व सुरकुत्या नसलेले दाणे – चांगले.७०% किंवा अधिक दाणे चांगले असल्यास बियाणे वापरण्यास योग्य.

पेरणीपूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करणे का आवश्यक?

बियाणे कितीही चांगले असले, तरी त्यावर योग्य ती प्रक्रिया करणे अत्यावश्यक असते. बुरशीनाशक (Fungicide) व जिवाणू संवर्धक (Biofertilizer) यांची प्रक्रिया केल्यास बियाण्याच्या उगवणीत वाढ होते व रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक वेळी बियाणे विकत घेण्याऐवजी उगवणक्षम बियाणे घरीच तयार करून वापरा.

पेरणीपूर्वी घरीच उगवणक्षमता तपासा :

७०% हून अधिक उगवण असलेले बियाणे वापरण्यास हरकत नाही. उगवणक्षमता कमी असल्यास प्रमाण वाढवून पेरणी करा. बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धक प्रक्रिया करू नका विसरू.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :

आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे यासाठी मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button