आठवडा विशेष टीम―
मुंबई दि. १४: राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार, सेवाशर्तीचे नियमन करणे, त्यांची सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठी राज्य शासन सातत्याने उपाययोजना राबवित आहे. त्याअनुषंगानेच जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी व्हावी व त्यांना योजनेचे सर्व लाभ मिळावेत ही बाब विचारात घेवून तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतणीकरण, लाभाचे अर्ज करताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार आशिष देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री. कुंभार, उपसचिव दीपक पोकळे, महसूल उपसचिव धारुरकर आदी उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना न्याय देता यावा तसेच शासनाच्या सर्व योजनांमध्ये त्यांचा समावेश करून घेता यावा, यासाठी जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. याकरिता संजय गांधी निधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ज्याप्रमाणे तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुकास्तरावर, ग्राम पातळीवर स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश करून समिती स्थापन करण्याबाबत सविस्तर अभ्यास करून तसा अहवाल सादर करण्यात यावा. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण करणे आणि लाभाचे वाटप करण्यासाठीची प्रक्रिया ही आधार ओटीपीशी लिंक करण्यात यावी, असे निर्देशही यावेळी मंत्री बावनकुळे यांनी दिले.
०००
जयश्री कोल्हे/ससं/