प्रशासकीयब्रेकिंग न्युज

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते  बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (दूरदृश्य प्रणालीद्वारे),  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे,  निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. वारी कालावधीत अन्न शुद्धतेची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि येत्या काळात अन्न भेसळ करणाऱ्याविरोधात व्यापक मोहीम राबवावी. पालखी सोहळ्यासंदर्भातील राज्यस्तरीय बैठकीपूर्वी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण करावी. इतर जिल्ह्यात किंवा विभागात बदली झालेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा घेण्याबाबत संबंधितांना विनंती करावी. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत परस्पर समन्वय ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त पुढे  म्हणाले, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी. पालखी सोहळ्यादरम्यान आणि नंतरही स्वच्छता रहावी यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील यासाठी आवश्यक उपाय योजावेत. नीरा नदी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पालखी पुढे गेल्यावर मागील गावात त्वरित स्वच्छता करावी. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतांना रुग्णवाहिकेत पुरेशा प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय अधिकारी असतील याची दक्षता घ्यावी.

पालखी मार्ग खड्डे मुक्त राहतील व उत्तम वाहतूक व्यवस्थापन राहील याची काळजी घ्यावी. पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. घाट परिसरात दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तिन्ही जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील व्यवस्थेबाबत एकत्र पुस्तिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरणीकरणाद्वारे पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. सोहळ्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली स्थापण्यात आली आहे २५ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सोहळ्यादरम्यान १ हजार ८६० स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. पालखी मार्गावर पाणी, विद्युत, आरोग्य, गॅस सिलेंडर, स्वच्छता आदी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात येत आहेत. वारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत चाचणी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील व सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी जिल्ह्यातील तयारीची माहिती दिली. बैठकीला पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button