प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आठवडा विशेष टीम―

नागपूर दि 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दुर्धर आजाराच्या विळख्यातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी येथील शासकीय महाविद्यालयात दर्जेदार उपचार सुविधांच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज जवळपास 70 कोटी खर्चून निर्माण करण्यात आलेल्या विविध सुविधा व विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, संदीप जोशी, कृपाल तुमाने, अभिजीत वंजारी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, संचालक डॉ.अजय चंदनवाले, सहसंचालक विवेक पाकमोडे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आदी उपस्थित होते.

श्री फडणवीस म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या मध्य भारतातील मोठ्या स्वरूपाच्या वैद्यकीय संस्था आहेत. सर्व स्तरातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र आधुनिक काळाशी अनुरूप अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याची गरज भासू लागल्याने येथे आधुनिक संसाधनांची उभारणी करण्यावर भर देण्यात येत आहे. विविध पायाभूत सुविधांमुळे या संस्थांच्या गुणात्मकतेत वाढ होणार आहे. या दोन्ही संस्थांमध्ये दर्जेदार सुविधांच्या निर्मितीसाठी व अद्ययावत उपचारासाठी जवळपास हजार कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रयत्नातून ह्या संस्था आधुनिक भारतातील ‘स्टेट ऑफ आर्ट’ वैद्यकीय संस्था म्हणून नावारूपाला याव्यात, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

रुग्णालयांना समाजातील आशेचे केंद्र  म्हणून बघितल्या जाते. वैद्यकीय उपचार व शिक्षण क्षेत्रात या दोन्ही संस्था अग्रेसर राहाव्यात तसेच खाजगी संस्थांच्या तुलनेत येथील शिक्षण, सुविधा व उपचार अधिक दर्जेदार असावे असे सांगून श्री फडणवीस यांनी बाह्यरुग्ण तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधांच्या निर्मितीवर प्राधान्याने भर द्यावा अशी सूचना केली. यातूनच नजीकच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट झालेला आपल्या दृष्टीस पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात प्रारंभ होत असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण व उद्घाटन करण्यात आलेली कामे

येथे कार्यरत 250 निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह, रुग्णांना ने-आण करण्यासाठी ट्रॉमा इमारत ते बाह्य रुग्ण विभाग यांना जोडणारा स्काय वॉक (4.93 कोटी), ऑडिटोरियम (5.25 कोटी), गंभीर आजारांचे निदान करणारी यंत्रणा न्यूक्लिअर स्कॅन (8. 29कोटी), हृदयविकार असलेल्या रुग्णांचे निदान करण्यासाठी कार्डियाक कॅथ लॅब (6.87 कोटी), अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक सर्जरी सिस्टीम (20.82 कोटी), कॅन्सरसारख्या व इतर दुर्धर आजारांवर अत्याधुनिक उपचाराकरिता मध्य भारतातील शासकीय रुग्णालयातील पहिली न्यूक्लियर मेडिसिन सिस्टीम (8.29 कोटी), स्मार्ट क्लास रूम (1.5 कोटी), रुग्णालयाशी संबंधित इतर सुविधा (11 कोटी)

आयजीएमसीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (आयजीएमसी) येथे मेगा डायलिसिस सेंटर व रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील प्रलंबित कामांचा आढावा घेतला.

येथील विद्यार्थ्यांसाठी 3 व्हर्चुअल स्मार्ट वर्ग खोल्या तयार झाल्या असून उर्वरित चार वर्ग खोल्यांना मान्यता देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली व त्याबाबतचे प्रस्ताव शासनास तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. रुग्णालय व महाविद्यालयाला आवश्यक त्या विविध यंत्रसामग्रीच्या उभारणीबाबत शासनास सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयातील काही कामांना मान्यता मिळाली परंतु निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी रुग्णालयात कार्यान्वित विविध कक्षांची माहिती देणारे सादरीकरण केले.

लोकार्पण करण्यात आलेली कामे

येथील पाचशे खाटांच्या इमारत निर्मितीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या. येथील विविध प्रकारच्या सोयी सुविधांच्या निर्मितीची कामे प्रगतीपथावर असून समन्वयाने व गतीने कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचना केल्या.

मेगा डायलिसिस सेंटरसाठी 80 लक्ष सीएसआर निधीतून 10 मशीन लावण्यात आल्या. हे केंद्र औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या अधिपत्याखाली येत असून डायलिसिस मशीन चालवण्यासाठी येथे तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेला रुग्णसेवेसाठी रक्तपेढी विभागासाठी रक्त संक्रमण व्हॅन तसेच र 1 कोटी 70 लक्ष किमतीच्या चार ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णांचे तात्काळ रोगनिदान करण्यासाठी नमुन्यांची तपासणी इथेच करता यावी यासाठी मॉलिक्युलर लॅब स्थापित करण्यात आली असून 13 कोटी 50 लक्ष एवढा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असून ही लॅब कार्यान्वित झाली आहे

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button