प्रशासकीयब्रेकिंग न्युज

राज्याचे ‘पार्किंग’ धोरण लवकरच आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १९  : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ आणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री  ‌प्रताप सरनाईक यांनी दिली.

या संदर्भात मंत्रालयात आयोजित मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये श्री. सरनाईक बोलत होते. बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह  एम.एम.आर.डी.ए. मधील सर्व महापालिका आयुक्त उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्याआधी  अंमलबजावणी दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये. यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये  वाहतूक कोंडी समस्येने उग्र रूप धारण केले आहे, त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना, अभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल, तर  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये ते प्रभावीपणे राबवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविले असल्याचेही श्री.सरनाईक यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईल, असे  श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल, अशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार वाहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत. विकास आणि सुविधासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत. यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर  महापालिकांनी स्वीकारावे, जेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button