प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

आठवडा विशेष टीम―

छत्रपती संभाजीनगर, दि. 20: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्त हानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे; तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी. आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता व प्रशासक राजू देशमुख, विभागीय कृषी सहायक संचालक पी. आर. देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले, हवामान विभागाने वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून नियोजन करावे. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी. जलसंपदा विभागाने विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी, असे सांगून विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले, पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम भागामध्ये तत्परतेने मदत पोहोचण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क रहावे, विजेचे संकेत देणाऱ्या दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करा, पोलीस पाटील तसेच गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावात पावसाबाबत तसेच आपत्ती कालावधीत सतर्क करण्याबाबत माहिती पोहचवा, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी यंत्रणेला दिल्या.

पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्यावी. महानगरासह नगरपालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई कामे तातडीने पूर्ण करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी सीमांकन करावे. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवा. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट आदी विविध साधने, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, नियंत्रण कक्ष, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिले.

यावेळी जिल्हानिहाय मान्सूनपुर्व तयारीबाबत सबंधित जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली.

बैठकीला जलसंपदा, नगरप्रशासन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महसूल तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांच्या ठळक सूचना

  • पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्त हानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे
  • आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी
  • आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करा
  • पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी
  • मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी
  • पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे
  • आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क रहावे

विजेचे संकेत देणाऱ्या दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करा

 

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button