प्रशासकीयब्रेकिंग न्युज

मुंबई देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे हब महाराष्ट्र स्टार्टअप्समध्ये संपूर्ण देशात अग्रेसर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २१: स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे मुंबई हब बनले आहे. देशाच्या एकूण स्टार्टअप्सपैकी २४ टक्के महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सीएसआयआर आणि तीन प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्र स्टार्टअप्सच्या बाबतीत संपूर्ण देशात क्रमांक एकवर असून २०२५ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात २६ हजार ६८६ स्टार्टअप्स आहेत. जे देशातील एकूण स्टार्टअप्सच्या २४ टक्के आहेत. गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंड्सच्या उपलब्धतेमुळे मुंबई स्टार्टअप्ससाठी सर्वात योग्य ठिकाण बनत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’, ‘मुंबई फिनटेक हब’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ तयार केल्या आहेत. त्यामुळे मुंबई हे आर्थिक आणि तांत्रिक इनोव्हेशनचे केंद्र बनले आहे. फिनटेक, ई-कॉमर्स, हेल्थटेक, एडटेक आणि डीप टेक स्टार्टअप्स झपाट्याने विकसित होत असून देशातील सर्वाधिक म्हणजे २७ युनिकॉर्न कंपन्या महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई हे देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणारे स्टार्टअप हब आहे. या वर्षी स्टार्टअप्सनी एकूण ३.७ बिलियन डॉलर्सचा निधी प्राप्त केला जो गेल्या वर्षाच्या तुलनेत १५४ टक्के अधिक आहे. पुणे हे माहिती व तंत्रज्ञान, वाहन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. आता नवी मुंबईत ३०० एकरावर देशातील सर्वात आधुनिक ‘इनोव्हेशन सिटी’चे बांधकाम सुरू आहे. जेथे विज्ञान, तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, डेटा सायन्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्स विकसीत होतील.

भारतात सध्या दीड लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत असून भविष्यात भारत हे जगातील सर्वोत्तम स्टार्टअप केंद्र बनू शकते. सीएसआयआर- एनसीएल,  सीएसआयआर  निरी आणि सीएसआयआर एनआयओ या संस्थांनी या कॉनक्लेव्हचे आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक महासत्ता बनवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आपल्या भाषणाच्या सरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना आदरांजली अर्पण केली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button