प्रशासकीयब्रेकिंग न्युज

धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

आठवडा विशेष टीम―

धुळे, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. रोहिणी ग्रामपंचायतीस ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि १० लाखांचा रोख पुरस्कार मिळणार आहे. आंध्र प्रदेशातील नोव्होटेल, विशाखापट्टणम येथे ९ जून २०२५ रोजी होणाऱ्या २८ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२३-२४ स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता़. त्यामधून धुळे जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर रोहिणी, ता़. शिरपूर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती़. या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून १८ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती, त्यात राज्यात पहिला क्रमांक मिळवून शिरपूर तसलुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतींची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली होती. तर या स्पर्धेसाठी देशभरातून फक्त ६ ग्रामपंचायती या पुरस्काराच्या स्पर्धेत  होत्या. त्यातील महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीस सुवर्ण पुरस्कार, पश्चिम मजलीशपूर, जि़. पश्चिम त्रिपुरा (त्रिपुरा) ग्रामपंचायतीस रौप्य पुरस्कार, पलसाणा, जि़. सुरत (गुजरात) आणि सुकाटी जि. क़ेंदुझार (ओडिशा) या ग्रामपंचायतींना ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेत प्रामुख्याने ग्रामपंचायती किंवा समतुल्य पारंपरिक स्थानिक संस्थांद्वारे केलेल्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून सेवा वितरण अधिक सखोल/विस्तारित करण्यासाठी ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्हज” या श्रेणी अंतर्गत सुवर्ण, रौप्य आणि ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी १० मे रोजी दिल्लीतील सेंट्रल ज्युरी टीमसमोर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सादरीकरण केले होते.

रोहिणी ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा

ऑनलाईन सेवा ग्रामस्थांना घरबसल्या कशाप्रकारे देता येतील याचा विचार रोहिणी ग्रामपंचायतीने केला आहे़. त्यासाठी विविध माध्यम, शासनाचे अॅकप, पोर्टल यांचा वापर केला आहे़. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीला राज्य शासनाकडून महाऑनलाईन आयडी प्राप्त झाला आहे़, त्याद्वारे साधारण 956 अन्य सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविल्या जात आहेत़. त्याचप्रमाणे रोहिणी ग्रामपंचायतीत महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन या विभागातंर्गत ऑनलाईन प्रणालीचा उपयोग सेवा वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे़. या ग्रामपंचायतीने निर्णय, मेरी ग्रामपंचायत, चॅट जीपीटी याआधारे ग्रामस्थांचा सहभाग घेतला आहे़. तसेच ग्रामपंचायतीने विविध प्रकारच्या लिंक, युटयुब, फेसबुक, इन्स्टाग्रॉम या माध्यमातून देखील शेअर केले आहेत़. रोहिणी हे गाव 100 टक्के आदिवासी गाव असतांना देखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़. शाळा, आरोग्य, अंगणवाडी, कृषी आदींमध्ये ई-गर्व्हनन्स प्रणालीचा वापर केला जात आहे़.

अनुसूचित क्षेत्राअंतर्गत ‘पेसा’ गावातील रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल सेवा प्रभावीपणे राबवल्या आहेत. नागरिक सेवांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुलभता लक्षात घेऊन, ग्रामपंचायतींकडून जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.  ही सुविधा विशेषत: दुर्गम, आदिवासी भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ग्रामपंचायतीने त्यांच्या वेबसाइटवर एक लिंक दिली असून ज्याद्वारे नागरिक घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण होते. दोन्ही पोर्टल वापरकर्ता-अनुकूल,  मोबाईल फ्रेंडली, नागरिक-केंद्रित आहेत. या उपक्रमातून आदिवासी पेसा गाव देखील डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकार करू शकते हे रोहिणी गावाने दाखवून दिले आहे़. रोहिणी ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाइन माध्यमातून जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया एक प्रभावी डिजिटल सेवा आहे.

रोहिणी ग्रामपंचायतीकडून मृत्यू प्रमाणपत्रांची सेवा ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलितपणे आणि पूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून दिली जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, 2015 अंतर्गत विहित केलेल्या ७ कामकाजाच्या दिवसांच्या कालावधीत नागरिकांना ही सेवा प्रदान केली जात आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांना ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांच्या व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे मृत्यू प्रमाणपत्र मिळते़ रोहिणी ग्रामपंचायतीद्वारे मृत्यू प्रमाणपत्रांची डिजिटल सेवा केवळ नागरिक-केंद्रित आणि पारदर्शक नाही तर ग्रामीण पातळीवर डिजिटल कार्यक्षमता आणि तांत्रिक स्वावलंबनाचे एक उत्तम उदाहरण देखील आहे. ही प्रणाली गावपातळीवर एक प्रभावी सार्वजनिक सेवा वितरण मॉडेल म्हणून पाहिले जात आहे.

रोहिणी ग्रामपंचायतीचा ई-गव्हर्नन्स ग्रामपंचायत म्हणून राज्य शासनाकडून पुरस्कार देवून नुकताच सन्मान करण्यात आला. या पुरस्काराकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, विस्तार अधिकारी संजय पवार यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे रोहिणी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ़ आनंद पावरा, ग्रामसेवक आर. क़े. क़ुमावत यांनी सांगितले.

00000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button