प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

आठवडा विशेष टीम―




मुंबई, दि. २२: डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर व्यक्तीचे नाव. करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील.

आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले आणि करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले.

करंदीकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात रहात असत. गतवर्षी ऑगस्टमध्ये करंदीकर यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशांसाठी करावी लागणारी धडपड सदानंद करंदीकर जवळून पाहिली. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच अध्यात्मात आणि शेतीत रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला १० लाख असा एकूण २० लाख रुपयांच्या निधीचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

सदानंद करंदीकर ८२ वर्षांचे आहेत. सध्या ते त्यांच्या भगिनी प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे वास्तव्यास आहेत. वृध्दाश्रम, कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबियांची धावपळ यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सिंधुदुर्ग सुपुत्र करंदीकर यांनी सागरा प्रमाणेच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचे आपले दातृत्वही अमर्याद असल्याचे सिद्ध केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button