प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जागतिक पातळीवर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यास राज्यशासन प्रयत्नशील- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि.२२: मराठी भाषेचे जतन, संवर्धन करुन पुढच्या पिढीला देखील मराठी भाषेचे ज्ञान उपलब्ध झाले पाहिजे, याकरीता  प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटेल अशाप्रकारे जागतिक पातळीवर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्ती, संस्थेला राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

गुजर-निंबाळकरवाडी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यान भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरहद संस्थेचे संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्यासह संजय पगारिया, अनुज नहार, यशपाल जवळगे तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. सांस्कृतिक, साहित्याची ऊर्जा मिळाली. सरहद संस्थेमार्फत समाजउपयोगी संकल्पना आखून त्या यशस्वीरित्या पार पाडण्याचे काम करण्यात येत आहे. त्यातून समाजाला नवीन दिशा मिळाली आहे.

सरहद संस्थेचे संजय नहार यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारत आहेत. साहित्याच्या क्षेत्रात काम करणारे दर्दी लोक आज अतिशय उत्तम पद्धतीने देशातील पहिले साहित्याचे दालन खुले करीत आहेत. मराठी भाषेच जतन, प्रचार, प्रसार आणि संवर्धन झाले पाहिजे. अशा अनेक गोष्टी अशा कार्यक्रमातून साकार होतात म्हणून असे कार्यक्रम झाले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यामध्ये ७५० वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा सिंहाचा वाटा आहे. या ग्रंथाचा संदर्भ घेऊनच हा दर्जा बहाल केला गेला याचा आम्हाला अभिमान आहे. आळंदी देवस्थानच्यावतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ छपाईकरिता करण्यात आलेल्या
मागणीप्रमाणे १ कोटी रुपयांचा निधी ४८ तासाच्या आत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. मराठी भाषेचे इंग्रजी भाषेला पर्यायी शब्द निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

श्री. नहार म्हणाले, साहित्य संमेलन हा एक कार्यक्रम न राहता लोकसहभागाच्या माध्यमातून साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराची चळवळ झाली पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनेक मोठमोठे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष होऊन गेले आहेत. त्यांची ओळख पुढच्या पिढ्यांना झाली पाहिजे ही भावना हे उद्यान उभे करण्यामागे आहे, असेही ते म्हणाले.
0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button