प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि. 24पुणे बाल पुस्तक जत्रासारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतीलअसे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केले.

 राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगर पालिका, पुणे पुस्तक महोत्सव संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रा 2025ला अ‍ॅड.आशिष शेलार यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त पृथ्वीराज बी. पी., राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक तथा पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संवाद संस्थेचे संस्थापक संचालक सुनील महाजन, चिंटूकार चारूहास पंडीत आदी उपस्थित होते.

अ‍ॅड.शेलार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इंटरनेटच्या युगात लहान मुलांच्या संवेदना जागृत रहाव्यात, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांच्या गुणांचा विकास व्हावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. त्यामुळे सांस्कृतिक विभाग या बाल पुस्तक जत्रेचा अधिकृत सहयोगी होईल, राज्यात बालसंस्काराचे एक मॉडेल म्हणून हा उपक्रम ओळखला जाईल.

 पुणे बाल पुस्तक जत्रेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करताना ते म्हणाले, आज कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असताना समाजासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी असे आयोजन उपयुक्त आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला वास्तविक बुद्धिमत्तेची जोड दिल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. मुलांमध्ये अशी बुद्धिमत्ता निर्माण करण्याची क्षमता बाल पुस्तक जत्रेत आहे. बालकांसाठी पुस्तके, खेळ, सांस्कृतिक देवाण घेवाण आणि इतिहासाची माहिती असे सर्व एकाच ठिकाणी पहिल्यानंतर उपक्रमाचे महत्व कळते आणि हे सर्व वातावरण आजच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अविश्वसनीय वाटते, अशा शब्दात अ‍ॅड.शेलार यांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

 महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, पुणे महानगरपालिका स्थापनेचे 75 वे वर्ष असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. बाल पुस्तक जत्रेला पहिल्याच वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता दरवर्षी हे आयोजन करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राष्ट्रीय पुस्तक न्यासासाठी जागा महापालिकेने उपलब्ध करून दिली असून पुण्याला पुस्तकाची राजधानी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, महाराष्ट्रातील बाल पुस्तक जत्रेचा हा पहिलाच प्रयोग असून अडीच दिवसात 25 हजार मुलांनी भेट दिली. मुले जत्रेचा आनंद लुटत आहेत. राज्य शासनाचे सहकार्य असल्याने अशा कार्यक्रमांचे कार्यक्रम शक्य होते.

 प्रारंभी मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी  प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट दिली.  मुलांचे खेळ पाहतानाच स्वत: त्यांनी विटी-दांडू हाती घेऊन खेळाचा आनंद घेतला. त्यांच्या हस्ते  विविध बाल पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जॉर्ज कार्व्हर, गोष्ट छबीची, अनोखे मित्र आणि साने गुरुजी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button