प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पशुसंवर्धन व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक-उपमुख्यमंत्री अजित पवार

आठवडा विशेष टीम―

जैव सुरक्षा प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा,

सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन

पुणे, दि. 24: राज्यातील पशुपालकांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी दर्जा देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. औंध येथे जैव सुरक्षा स्तर-2 (बीएसएल-2) व स्तर- 3 (बीएसएल- 3) प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा आणि सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, आमदार उमा खापरे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे आदी उपस्थित होते.

आज उद्घाटन झालेल्या प्रयोगशाळा, रुग्णालय आदी सुविधा या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला उत्तम आरोग्यासाठी तसेच पशुधनापासून मिळणारे उत्पादन आणि उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या सुविधांच्या निर्मितीसाठी 86 कोटी रुपये राज्यशासनाने खर्च केले आहे. देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक व्यवस्थित सुविधा महाराष्ट्राने या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाला योजनांसाठी निधीची  कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

राज्यातील शेतकरी, पशुपालकांना पशुधनापासून व पशुपालनापासून येणारे उत्पन्न दुप्पट करावे. पशुसंवर्धनाशी निगडीत अनेक बाबतीत आपण देशात पुढे असले तरी अंडी उत्पादन व कुक्कुटपालनात सहाव्या-सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या क्षेत्रात आघाडीवर येण्यासाठी पशुपालकांना विविध सोयी, सवलती देणे आवश्यक आहे. आपल्याला पशुपालकांचे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ करायचे असून त्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करायचे आहे.

प्रयोगशाळेत होणारे संशोधन आणि तेथे निर्मिती होणारी लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अलिकडच्या काळात प्राण्यांपासून माणसांना अनेक आजार होतात, त्यामुळे याबाबतीतही अधिक संशोधन आणि लस निर्मिती होण्याची गरज आहे.

माणूस आणि प्राण्यांचे नाते ऐतिहासिक काळापासूनचे आहे. शेती आणि पशुपालनाच्या माध्यमातून माणसाने आपले भरणपोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. हाच प्रयत्न आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा असून त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाला चालना दिली जात आहे.

पशुसवंर्धन विभागात सर्वात पारदर्शक बदल्या झाल्याबद्दल आणि विभागाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच जीएमपी प्रमाणपत्र मिळाल्याबद्दलही पशुसंवर्धनमंत्री विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. आरोग्याच्या दृष्टीने सर्वच बाबतीत स्वच्छतेला महत्त्व असून त्याचे पालन होणे गरजेचे आहे. प्लास्टिकबंदीसाठी आग्रही राहू असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

समुपदेशनाद्वारे बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये समाधान-मंत्री पंकजा मुंडे

पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, विभागाचे काम करत असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळेल असे काम करण्याचा प्रयत्न आहे. अनेक पशुवैद्यकीय अधिकारी आदिवासी विभागात, अवघड क्षेत्रात काम करत होते. विभागाने समुपदेशनाने बदल्यांचा निर्णय घेतल्याने जवळपाच 560 बदल्या केल्या त्यापैकी 99 टक्के अधिकाऱ्यांना त्यांच्या इच्छेच्या ठिकाणी बदल्या मिळाल्या. या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पशुपालकांच्या कल्याणासाठी काम करावे, असेही ते म्हणाले.

पशुसंवर्धनाच्या योजनांचे लाभ कृषीप्रमाणे पशुपालकांना मिळावेत यासाठी पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा मिळावा. गाई- पशु हे उघड्यावरील प्लास्टिक खात असल्याने त्याचे अंश दुधात येऊन बालकांना अनेक आजार जडत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदीबाबत विचार व्हावा, असेही त्या म्हणाल्या. दूध भेसळीला अटकाव करण्यासाठीचा कायदा कडक करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात सर्वच निकषात उत्कृष्ट काम करून विभाग पहिल्या क्रमांकावर आल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

सचिव डॉ. रामास्वामी एन. म्हणाले, आज स्थापन झालेल्या राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळेचा लाभ महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव व दमन आदी देशाच्या पश्चिम क्षेत्राला होणार आहे. बीएसल-२ व बीएसएल-3 प्रयोगशाळा आणि सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे पशुपालकांना लाभ होणार आहे. येथील प्रयोगशाळेला जीएमपी प्रमाणिकरण प्राप्त झाल्यामुळे तयार होणाऱ्या लसीला देशात मान्यता व मागणी वाढेल. रुग्णालयात अजून अत्याधुनिक यंत्रसामुग्री घ्यायची असून त्यासाठी अधिक निधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी या विविध प्रयोगशाळा आणि रुग्णालयांचे उद्घाटनानंतर मान्यवरांनी त्यांची पाहणी करुन माहिती घेतली. कार्यक्रमादरम्यान विभागाला मिळालेल्या जीएमपी प्रमाणीकरण प्रमाणपत्राचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button