प्रशासकीयब्रेकिंग न्युज

मान्सून कालावधीत प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

आठवडा विशेष टीम―

सातारा दि. २६:  मान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे. काम करीत असताना नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात. मान्सून कालावधीत अति पावसामुळे कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्यास संपर्क पुन्हा प्रस्थापित करुन देण्याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,   पावसामुळे जिथे शेती पिकांचे, पशुधनाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पाऊस उघडताच गतीने सुरु करावे. या पंचनाम्यातून एकही बाधित मदतीपासून वंचित राहू नये.  दरड प्रवण गावांचे जीआयएस सर्व्हेक्षण झाले आहे. ज्या गावांचे स्थलांतर करण्याबाबत सांगितले आहे त्या गावांच्या स्थलांतरासाठी शासकीय जमिनीचा शोध घ्यावा.

मान्सून कालावधीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक कोयनानगर येथे ठेवावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शेंद्रे ते कागल रस्त्यांचे काम सुरु आहे. या कामाच्या अनुषंगाने सेवा रस्त्यावर ठेवलेली विविध यंत्रे काढून सेवा रस्त्यावरील वाहतूक विना अडथळा होईल याची दक्षता घ्यावी. सध्या पावसामुळे महामार्गावर पाणी येत आहे. यामुळे वाहतुक कोंडी होत आहे. महामार्गालगची गटारे साफ करावीत. वाहतुकीदरम्यान वाहनधारकांना कोणतीही अडचण होणार नाही याची रस्ते विकास महामंडळाने खबरदारी घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी पंचनामे करावेत. ज्या गावांवर डोंगरातील दरडी पडत असतील तर अशा गावांमध्ये डोंगराच्या कडेला बांबू लागवड करावी. बांबू मुळे दरडी पडण्याचे प्रमाण खूप कमी असते. दरड प्रवण गावांचे जीआयएस सर्व्हेक्षण झाले असून आवश्यकतेप्रमाणे पुन्हा या गावांचे सर्व्हेक्षण करावे.

दरड प्रवण गावांमधील नागरिकांची राहण्याची सोय करावी. महामार्गावरील तुंबलेली गटारे खुली करावीत. तसेच रस्ते विकास महामंडळाने महामार्गावरील गस्त वाढवावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी बैठकीत केल्या.
0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button