बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

परळी-अंबाजोगाई तालुक्याला मिळाला अखेर सोयाबीनचा विमा ; पंकजाताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

आजपासून बॅंक खात्यात होणार जमा

परळी:आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई या तालुक्यांतील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१८ साठी सोयाबीनच्या विम्याचा लाभ मिळाला असून त्याचे वाटपही उद्यापासून सुरू आहे. ऐन दुष्काळात आर्थिक हातभार लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या मराठवाडय़ातील शेतकरी दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. सलग तीन वर्षापासून दुष्काळ असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. २०१८ च्या खरीप हंगामातील सोयाबीनचा विमा मिळाला तर मदत होईल म्हणून शेतकरी विम्यासाठी आग्रही होते. या बाबतीत बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी कालच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याशी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला होता, काल पुन्हा त्यांनी त्यांचेशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. बीड जिल्ह्य़ातील शेतकरी अडचणीत, पाऊस झाला नसल्याने पीके वाळुन गेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनची लागू झालेली विमा रक्कम अदा करणेबाबत त्यांनी सूचना केल्या. यामुळे तातडीने हालचाली करून विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.

परळी वैजनाथ तालुक्यासाठी प्रती हेक्टरी रू. २९ हजार ७५९ रूपये तर अंबाजोगाई तालुक्यासाठी ३३ हजार८४९ रूपये याप्रमाणे विमा लागू झाला आहे. दरम्यान पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या पासून वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गरजेच्या वेळी रक्कम मिळवून दिल्याबद्दल ना. पंकजाताई यांचे शेतक-यांनी आभार व्यक्त केले आहेत.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.