प्रशासकीयब्रेकिंग न्युज

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात मांडण्यात आलेले त्यांचे विचार आणि अनुभवांच्या बोलामुळे नवउद्योजकांना आणि देशासाठी काही करण्याची उर्मी असणाऱ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्राज इंडस्ट्रिजचे अध्यक्ष व पुस्तकाचे लेखक डॉ. प्रमोद चौधरी, भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष  प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशक विकास सोनी, अतुल मुळे आदी उपस्थित होते.

डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासारख्या नाविन्याचा ध्यास असणाऱ्या संशोधकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करतांना आनंद होत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुस्तकाचे सिंहावलोकन करतांना त्यांचे जीवन आणि संघर्षासोबत पुढच्या पिढीसाठी त्यांनी मांडलेले विचार महत्वाचे वाटतात. एखाद्या व्यक्तिचे व्यक्तिमत्व त्याच्या विचारातून लक्षात येते. पुस्तकातून डॉ. चौधरी यांच्या जगण्यातील मूल्ये कळतात, त्यांनी कठीण परिस्थितीतून मिळवलेले यश लक्षात येते. गुणवत्ता, तंत्रज्ञान, विश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी उद्योग क्षेत्रात यश संपादन केले.

पुस्तकातून २००९ ते २०१४ या संघर्ष काळातील उद्योगाची स्थिती मांडण्यात आली आहे. इथेनॉलच्या संदर्भात तत्कालिन प्रधानमंत्री  स्व. अटल बिहारी वाजपेयी असतांना अनुकूल निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच्या काळात आलेल्या संकटावर डॉ. चौधरी यांनी नवे उपाय योजून यशस्वीपणे मात केली. २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात इथेनॉलबाबत अनुकूल धोरण लागू करण्यात आले. हे धोरण प्रभावी लागू करण्यासाठी डॉ. चौधरी यांच्या सुचनेनुसार त्यात आणखी चांगले बदल करण्यात आले आणि त्यातून २० टक्क्यापर्यंत इथेनॉलचे संमिश्रण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून एकप्रकारे १ लाख कोटीपेक्षा अधिकचे परकीय चलन वाचवू शकत आहोत. या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नाला तंत्रज्ञान आणि सहकार्य प्राजने पुरविले, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी डॉ. चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला.

ते पुढे म्हणाले, टूजी इथेनॉलमुळे कृषी क्रांती शक्य झाली आणि शेतकऱ्यांचे सबलीकरणाकडे वेगाने वाटचाल सुरू झाली. साखर उद्योगासमोर आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी नवे तंत्रज्ञान देण्याचे कार्य आणि साखर कारखानदारीपुढे नेण्यामागे प्राजचे प्रयत्न आहेत. साखर उद्योगावर आधारित लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी उपपदार्थ निर्मिती महत्वाची ठरली आहे.  प्राजच्या माध्यमातून उप पदार्थांची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. स्वच्छ विमान इंधन निर्मितीतही प्राजने मौलिक योगदान दिले आहे. डॉ. चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे सीबीजीचे धोरण ठरविण्यात मदत झाली. त्यातून नवीन अर्थव्यवस्था निर्माण होतांना दिसत आहे.

देशासमोर प्लास्टिकचे संकट फार मोठे आहे. अविघटनशील प्लास्टिकच्या विघटनाचे तंत्रज्ञान प्राजमध्ये तयार करण्यात येत आहे. याच्यावर आधारित उद्योग देशात उभे करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी मार्गदर्शन केल्यास अर्थकारण आणि पर्यावरण दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. डॉ. चौधरी यांचे हे राष्ट्रकार्य असेच सुरू रहावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

प्रा. जोशी म्हणाले, भाषा आणि उद्योग यांचा जवळचा संबंध आहे. जागतिक स्तरावर मराठी उद्योजक यशस्वी होतांना तो मराठी भाषेचा सन्मान असतो. कोणतीही पार्श्वभूमी नसतांना ग्रामीण भागातून आलेल्या चौधरी यांची ही यशकथा युवकांना प्रेरणा देणारी आहे. जैव इंधन आणि जैव वायुच्या क्षेत्रात डॉ. चौधरी यांनी बहुमोल योगदान दिले आहे. त्यामुळे खनिज इंधनावरचे देशाचे अवलंबित्व कमी झाले आहे. नाविन्याचा ध्यास धरणारे आणि काळाच्या पुढे पाहणारे ते द्रष्टे उद्योजक आहेत. तरुण पिढीच्या आशा आकांक्षा जागविणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे हे पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले.

लेखक डॉ. चौधरी यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात देशात जैव इंधनाच्या विकासाला गती मिळाली आहे. या विकासाचा ध्यास घेवून केलेल्या प्रयत्नांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. यापुढील टप्प्यात जैव इंधनाचा अधिक उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करायचे आहे. शासनाकडून या दिशेने प्रयत्न होत आहेत. यामुळे कार्बनचे प्रमाण कमी करून पर्यावरणाला खूप मोठा फायदा होणार आहे. एनर्जी ट्रान्झिशनसाठी प्राजतर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. सोनी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button