प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जागरूक शेतकरी – सुरक्षित फवारणी….!

आठवडा विशेष टीम―

शेती करताना कीड नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो. मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही, तर याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. अनेकदा फवारणी करताना साध्या चुकांमुळे विषबाधा होऊन अपघात किंवा आजार उद्भवतात. त्यामुळे किटकनाशके फवारण्यापूर्वी, फवारताना आणि फवारणीनंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे.

फवारणी करण्याआधी वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या बाटलीवरील लेबल, सूचना पत्रक नीट वाचावे. त्या प्रत्येक रासायनाच्या विषारीपणाची पातळी वेगळी असते. यासाठी बाटल्यांवर लाल, पिवळा, निळा आणि हिरवा अशा रंगाचे त्रिकोणी चिन्ह असते. लाल रंग हे अत्यंत विषारी रसायन दर्शवते. या रंगांच्या आधारे निरक्षर व्यक्तीलाही त्या किटकनाशकाचे स्वरूप लक्षात येते.

फवारणीसाठी वापरण्यात येणारे यंत्र हे योग्य स्थितीत असावे. पंपाचे नोझल गळके असेल तर त्याचा वापर करणे टाळावे. तणनाशकासाठी वापरलेला पंप कीटकनाशकासाठी वापरू नये. मिश्रण तयार करताना सुरुवातीला थोड्या पाण्यात भुकटी मिसळून मग गरजेनुसार पाणी टाकावे. हे करताना हातात हातमोजे व तोंडाला मास्क लावणे आवश्यक असते. शरीर झाकलेले राहील अशा प्रकारचे कपडे वापरावेत. डोक्यावर कापड, पायात बूट आणि पूर्ण बाह्यांचे शर्ट, पायजमा वापरणे फायदेशीर ठरते.

फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेनेच फवारणी करावी. पावसाच्या वेळी किंवा पाऊस होण्याची शक्यता असताना फवारणी करू नये. फवारणीनंतर लगेच शेतात प्रवेश करणे टाळावे. फवारणी करत असताना खाणे, पिणे किंवा धूम्रपान करणे टाळावे. एक दिवसात सलग ८ तासांपेक्षा जास्त फवारणीचे काम करू नये आणि उपाशीपोटी फवारणी करणे आरोग्यदृष्टीने धोकादायक असते. सकाळी न्याहारीनंतरच हे काम करावे.

फवारणी झाल्यावर हात, पाय, चेहरा आणि इतर अंग साबणाने स्वच्छ धुवून घ्यावा. वापरलेले कपडे वेगळे ठेवावेत. वापरलेले साहित्य स्वच्छ करून सुकवून सुरक्षित स्थळी ठेवावे. हे साहित्य विहिरी, नदी किंवा ओढ्याजवळ धुणे टाळावे. वापरलेले पाणी पडिक जागी टाकावे. रिकाम्या बाटल्या जमिनीत पुराव्यात.

विषबाधा झाल्यास थोड्याच वेळात काही लक्षणे दिसून येतात – जसे की चक्कर येणे, उलटी होणे, डोळ्यांतून पाणी येणे, अंगावर चट्टे उठणे, डोळे अंधुक दिसणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, किंवा बेशुद्ध होणे. अशी लक्षणे दिसताच रुग्णास त्वरित नजीकच्या दवाखान्यात नेणे आवश्यक आहे. डॉक्टरांना नेमके कोणते किटकनाशक वापरले गेले होते, किती प्रमाणात आणि किती वेळापूर्वी हे घडले, याची माहिती दिल्यास उपचार अधिक योग्य प्रकारे करता येतात.

विषबाधा झाल्यावर रुग्ण पूर्ण शुद्धीत असेल तरच त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करावे. अन्यथा तसे करू नये. कधीकधी प्राथमिक उपचार म्हणून कोळशाची भुकटी पाण्यात मिसळून दिली जाते. परंतु हेही डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.

शेतीच्या आधुनिक काळात रसायनांचा वापर अपरिहार्य असला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे हे शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने किटकनाशक वापरताना योग्य ती दक्षता घ्यावी, यासाठीच ही माहिती सर्वांना समजून घेणे गरजेचे आहे.

0000

संकलन – युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button