प्रशासकीयब्रेकिंग न्युज

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध – मंत्री प्रा.डॉ. अशोक वुईके     

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दि. १३ (जिमाका): राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आणि ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. तेथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षणासाठी आदिवासी विभाग सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. आज इगतपुरी तालुक्यातील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंढेगांव येथे विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवासह आयोजित विविध कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन,विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास आयुक्त तथा ,शबरी वित्त व आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त (मुख्यालय) दिनकर पावरा, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नाशिक अर्पित चौहान, तहसीलदार अभिजीत बारवकर, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी विभाग) नाशिकचे कार्यकारी अभियंता निरज चोरे,   सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग प्रदिप दळवी यांच्यासह विभागाचे अधिकारी, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, पेसा क्षेत्रातील पदभरतीला सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून  शैक्षणिक वर्ष २०२५–२६  वर्षाच्या अखेरपर्यंत, बाह्यस्रोतामार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील शैक्षणिक व्यवस्थेला अधिक सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी विद्यार्थी-केंद्रीत दृष्टिकोनास प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षकांची उपलब्धता, शैक्षणिक साधनसामग्री, विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवासाच्या सुविधा, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर विशेष भर देत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेंतर्गत आदिवासी महिला व मुलींच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल. इगतपुरी तालुक्यात आदिवासी क्रीडा प्रबोधिनी उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात यावी. या क्रीडा प्रबोधिनी उभारणीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध दिला जाईल. आदिवासी विकासाच्या अन्य योजना पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील असे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, आज गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबाबत त्यांचा गौरव करतांना मनस्वी आनंद होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच इतर मुलांना प्रोत्साहन मिळणार आहे. आदिवासी जाती-जमाती आयोगास संविधानात्मक दर्जा प्राप्त झाल्यामुळे शासनाचा आभार व्यक्त करीत मंत्री झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने 15 जून  ते 30 जून 2025 पर्यंत धरती आबा जनभागीदारी अभियान राबविण्यात येत आहे. या अतंर्गत सर्व अनुसूचित जमातीना शासकीय कामकाजासाठी  लागणारे आवश्यक दस्तावेज आदिवासी विकास विभाग अंतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे दाखले, रहिवास दाखले, रेशन कार्ड, बँक खाते, किसान क्रेडीट, ईपीक कार्ड, सिकल सेल तपासणी, पी.एम.आवास योजना, उज्वला गॅस योजना, वीज जोडणी, जॉब कार्ड यांचा समावेश आहे. यासह 5 मेडीकल मोबाईल रूग्णवाहिकांद्वारे आदिवासी वाडी-वस्तीवर जावून रूग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त श्रीमती बनसोड यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.

मंत्री डॉ. वुईके यांनी शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी नवविद्यार्थ्यांचे स्वागत

मंत्री डॉ. वुईके व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी नवोगत विद्यार्थ्यांचे फुल देवून स्वागत करण्यात आले. प्रवेशित विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

डिजीटल एनवायरमेंट क्लासरूमचे उद्घाटन व ऑनलाईन संवाद

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प नाशिक व सार्वजनिक बांधकाम ( आदिवासी) विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा मुंडेगाव ता.इगतपुरी या आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतर करणे व डिजीटल क्लासरूम व टॅब लॅबचे उद्घाटन मंत्री डॉ. वुईके यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुका येथील धरती आबा जनजातीय ग्रामउत्कर्ष अभियान योजनेच्या राज्यस्तरीय प्रचार व प्रसिद्धी शुभारंभ कार्यक्रमात मंत्री डॉ. वुईके यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग नोंदवित ऑनलाईन संवाद साधला.

राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

यावेळी आश्रमशाळांमधील इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी कला व विज्ञान परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रूपये दहा हजार, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना रूपये सात हजार व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रूपये पाच हजार रकमेच्या धनादेश व सन्मान पत्राचे प्रदान मंत्री डॉ. वुईके आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ए.एन.एम नर्स यांना किट वाटप

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी नियुक्त परिचारिका यांना आरोग्य किट वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शबरी वित्त व विकास महामंडळाचे वाहन वाटप व लाभार्थींना धनादेश वाटप

शबरी वित व विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी महिला बचत गट यांना धनादेशाचे प्रदान तसेच व्यवसायासाठी वाहनाच्या चावीचे प्रातिनिधिक स्वरूपात आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन

इगतपुरी तालुक्यातील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंढेगांव येथील विद्यार्थ्यांसोबत आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

मंत्री डॉ. वुईके यांच्या स्वागत प्रसंगी आदिवासी नृत्य बँड पथक संचलनाने झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांचे प्रतिमा पूजन झाले. तसेच मान्यवरांच्या हस्ते आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने 15 जून  ते 30 जून 2025 पर्यंत धरती आबा जनभागीदारी अभियान राबविण्यात येणाऱ्या प्रचार रथाला मंत्री डॉ. वुईके यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. धरती आबा जनभागीदारी अभियानांतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक आयोजित राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियान कक्षाला भेट दिली. तसेच यावेळी आयोजित शिबिरात आदिवासी लाभार्थ्यांना ई-रेशन कार्ड, जिवंत 7/12, मनरेगा जॉब कार्ड, जातीचे दाखले, महिलांना बेबी केअर किट अशा विविध लाभांचे प्रदान करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button