प्रशासकीयब्रेकिंग न्युज

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 20 : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघर ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी  आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २० जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ४१.६, रायगड ४०.१, रत्नागिरी ४१.७,  सिंधुदुर्ग २४.२, पालघर ४१.६, नाशिक २७.४, धुळे १.५, नंदुरबार ४, जळगाव ३.४, अहिल्यानगर ८.४, पुणे २८, सोलापूर २,  सातारा २६.५,  सांगली ५.४,  कोल्हापूर १७.४, छत्रपती संभाजीनगर ७.२, जालना ५.५, बीड ४.८,  लातूर ०.६, धाराशिव ३.३, नांदेड ३.७,  परभणी ३, हिंगोली ७.८, बुलढाणा ६.५, अकोला ११.६, वाशिम ७.६ अमरावती १२, यवतमाळ ९.७, वर्धा १०.७, नागपूर ५.९, भंडारा ३.२, गोंदिया ३.९, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.       पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्यूसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भिमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण  ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्या लागत गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून  २२,३४५ क्युसेक, सीना नदी – सीना धरणातून  २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली या रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. चिंचगर कोरेगाव भैरवी रोड मधील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळयाने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे  चिपळूण, दापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button