प्रशासकीयब्रेकिंग न्युज

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान – केंद्रीय मंत्री अमित शाह

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २०: देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान राहील, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित ‘सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषदे’चे उद्घाटन व मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री शाह बोलत होते.

परिषदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गृहमंत्री शाह म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या विकासात्मक कामांमुळे मुंबईच्या पायाभूत विकासात अमुलाग्र बदल होत आहेत. मेट्रो, अटल सागरी सेतू, कोस्टल रोड करतानाच पुनर्विकासाची कामे वेगात सुरु आहेत. यामुळे मुंबईची पूर्वीची ट्रॅफिक, वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी चिंताजनक स्थिती बदलू लागली आहे. देशात विकासासाठी सर्व क्षेत्रात काम करताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने लॉजिस्टिक पार्क, देशातील ११ पैकी तीन औद्योगिक कॉरीडोर, बारा पैकी सात टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्रात दिले आहेत. वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पंचवीस हजार करोड रुपये उपलब्ध केले आहेत. विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळ संपवून समृद्धी आणली जाईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सकारात्मक काम होत आहेत.

केंद्र व राज्यात समान विचारांचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे. केंद्र सरकारने विविध अनुदानांच्या निधीतून राज्यामध्ये मोठी रक्कम विकासासाठी दिली आहे. यामध्ये पायाभूत विकासासाठी १० लक्ष करोड रुपये दिले असून केंद्र पुरस्कृत योजनांची अनुदान, राजस्व तूट अनुदान (devolution grant) याचा उल्लेख करता येईल. असे सांगून केंद्रीय मंत्री शाह यांनी राज्यासाठी दिलेल्या विविध निधीची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नीती निर्धारण धोरणामुळे आर्थिक विकासाबरोबरच भारताचा ‘ पासपोर्ट’  शक्तिशाली झाल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. विदेशात भारतीयांचे स्वागत हसून होत असून सन्मान मिळत आहे.

इंग्रज सत्तेच्या काळात उद्योग व विकासासाठी चेंबर्स ऑफ कॉमर्स ने केलेले काम बहुमोल असून पुढे येणाऱ्या शंभर वर्षात देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला उच्च स्थानावर नेण्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी निभावेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्योजक व व्यापाऱ्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्र हे देशातले अग्रेसर राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्याने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करताना अर्धा टप्पा पार केला आहे. देशाच्या ३१ टक्के परकीय गुंतवणूक मिळवण्यात देखील राज्याचा वाटा आहे. सर्वात जास्त वस्तू व सेवा कर जमा करणारे महाराष्ट्र राज्य असून या अग्रेसर राहण्यामध्ये राज्यातील उद्योग व व्यापाऱ्यांचे योगदान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उद्योग व व्यापारासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य राहिले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर यांनी पारतंत्र्याच्या काळापासून शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये देशाच्या उद्योग व विकासाचे भारतीयकरण होण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. हे एकमेव असे चेंबर ऑफ कॉमर्स आहे की, ज्यामध्ये कृषीचा देखील समावेश आहे. येथून पुढे देखील आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार, उद्योग, शेती विकासामध्ये संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली असून राज्याची अर्थव्यवस्था १२ लक्ष कोटी रुपयांवरून चाळीस लक्ष कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

व्यापार व उद्योगासाठी सुरक्षित वातावरण देणारे राज्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करतानाच, विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून व्यापार व उद्योगासाठी पोषक वातावरण तयार केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ऑपरेशन सिंदूर आणि गृहमंत्री शाह यांनी नक्षलवाद पूर्णपणे मिटवून टाकण्यासाठी केलेले काम, अशा सुरक्षित व आशादायी वातावरणात राज्यात सहकारातून समृद्धीकडे जाणारे वातावरण तयार झाले आहे. केंद्रीय मंत्री शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्राचा कायापालट करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जात आहे. तात्काळ निर्णय घेणारे आणि उद्योग वाढीसाठी सुरक्षित वातावरण देणारे हे राज्य आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शताब्दी वर्षानिमित्त गौरव चिन्हाचे अनावरण

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त गौरव चिन्हाचे अनावरण करण्यात आले. त्यांच्या हस्ते संस्थेच्या मुख्यालयाच्या नूतनीकृत इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या प्रमुख विश्वस्त व सभासदांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाचा’ कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास विभाग’ आणि ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर’ मध्ये यावेळी  सामंजस्य करार करण्यात आला.

०००

किरण वाघ/विसंअ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button