प्रशासकीयब्रेकिंग न्युज

योगाभ्यास करून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरा

आठवडा विशेष टीम―

नियमित योगाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते – निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली, दि. 21 : महाराष्ट्र सदनातील बँकेट सभागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’योगाभ्यास करून  उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राला दिलेल्या संदेशामध्ये योग साधनेचे महत्व सांगितले, “योग ही भारताला मिळालेली प्राचीन देणगी असून, ती शरीर, मन आणि आत्म्याला निरोगी ठेवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने योगाभ्यास जागतिक चळवळ बनली आहे. ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्यासाठी योग’ या संकल्पने अंतर्गत योगाचा प्रसार करून ‘फिट इंडिया’ आणि ‘निरोगी भारत’संकल्प साकार करूया.”

महाराष्ट्र सदनात झालेल्या योगाभ्यास सत्रात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी सांगितले, “दररोज केवळ पाच मिनिटे योगासने केल्याने मन आणि शरीर निरोगी राहते, तसेच ताजेतवाने आणि प्रफुल्लित राहता येते. योग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा. नियमित योगाभ्यासाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते, ज्यामुळे दैनंदिन जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडता येतात.”

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या प्रशिक्षक निशा चंद यांनी योगासनांचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रात्यक्षिके सादर केली.

या कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी तसेच सुरक्षा जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘ॐ’ च्या सामूहिक उच्चारणासह प्रार्थनेने झाली. सूक्ष्म व्यायामांमध्ये ग्रीवा चालन, कटी चालन आणि घुटना संचलन यांचा समावेश होता. योगासन सत्रात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, शशांकासन, मक्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन आणि शवासन यांचा समावेश होता. प्राणायाम सत्रात कपालभाती, नाडीशोधन, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम आणि ध्यान मुद्रा यांचा सराव झाला.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button