प्रशासकीयब्रेकिंग न्युज

ग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्री

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि. २१:महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी महत्त्वाची आहेत. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतीनी महत्त्वाची भूमिका निभवावी व शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.


विभागीत आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल वारीचा शुभारंभ तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास योजनेतील पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री श्री. गोरे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त नितीन माने, विजय मुळीक उपस्थित होते.
मंत्री श्री. गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था उभ्या केल्या आहेत. पंढरपूरला दर्शनासाठी येणारा प्रत्येकजण व्हीआयपी आहे. त्यामुळे आषाढी एकादशी होईपर्यंत सर्व व्हीआयपी दर्शन बंद केले आहेत. सर्व मंदिर परिसर वाहनमुक्त केला आहे. ३ हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून पंढरपूर मध्ये उद्या (२२ जून) महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

ते म्हणाले, आषाढीवारी मध्ये वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला असून पालखी तळ व मार्गावर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. ७ लाख रेनकोटची व्यवस्था करण्यात आली आहे. फिरते दवाखाने, औषधोपचार कीट, महिलांच्या स्नानगृहांची व्यवस्था, पर्यायी मार्ग तसेच यावर्षीपासून वृद्ध वारकऱ्यांसाठी मसाज व्यवस्था करण्यात आली आहे असे सांगून ‘सर्वांसाठी घरे’ या केंद्र सरकारच्या योजनेत एका वर्षात ३० लाख घरांना मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ६५ हजार कोटी रुपयांना मान्यता मिळाली असून याअंतर्गत एका वर्षात ५० टक्के घरे पूर्ण होतील. या योजनेतही ग्रामविकास विभागातील चांगल्या कामाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक करुन ग्रामविकास विभागामार्फत यंदाचा वारी सोहळाही सर्वोत्तम होईल असा विश्वास व्यक्त केला.


विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पंचायत राज व्यवस्था ज्या उद्देशाने स्वीकारली आहे, जे स्वप्न आपल्या राष्ट्रनिर्मात्यांनी पाहिले, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आणि प्रत्येक गाव स्वावलंबी व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायतींनी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले काम उत्कृष्ट आहे. सर्वांसाठी चांगले आरोग्य महत्त्वाचे आहे, त्यासाठी योगसाधनेला पर्याय नाही. ग्रामसभेमध्ये योग साधनेचा प्रसार करावा असा संदेश योग दिनाच्या निमित्ताने त्यांनी दिला.
ते म्हणाले, सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.  गावांमध्ये कचरा, प्लास्टिक, टाकाऊ अन्न इतरत्र पसरलेले असते, त्याबाबत जनजागृती आवश्यक आहे. संत गाडगेबाबा स्वच्छतेचे अग्रदूत आहेत. ग्रामविकासाची गीता संत तुकडोजींनी लिहिली. ग्रामगीतेमध्ये आरोग्य,सुंदर गावांची संकल्पना, स्त्री-पुरुष समानता, स्त्री संरक्षण आदी विविध पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे, असे सांगून सर्वांनी नद्यांचे पावित्र्य जपावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करावी. वारकऱ्यांनी हरित वारी, निर्मल वारीसाठी प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली.
सन २०२३-२४ महाआवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोकृष्ट जिल्हे, तालुके व ग्रामपंचायती तसेच शासकीय जागा उपलब्धता सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुके, वाळू उपलब्धता सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुक्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.


सन २०२२-२०२३ राष्ट्र संत तुकडोजी स्वच्छ ग्राम स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या ग्रामपंचायती : शेळकेवाडी (करवीर, कोल्हापूर), बोरगाव (कवठे महाकाल, सांगली), कवठे ( खंडाळा, सातारा )
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२०२३ अंतर्गत विभागस्तरीय विशेष पुरस्कार:
स्व. वसंतराव नाईक पुरस्कार-  दरेवाडी (सातारा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- ग्रामपंचायत सांडगेवाडी (सांगली), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- गोयेगाव (सोलापूर)
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभिमान २०२३-२४ जिल्हास्तरीय पुरस्कार: ग्रामपंचायत गावडेवाडी (प्रथम- ६ लाख), मांजरी खु. (द्वितीय- ४ लाख), सदोबाची वाडी (तृतीय- ३ लाख रुपये)
विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती- स्व. वसंतराव नाईक पुरस्कार-  चिंचोली (जुन्नर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- ग्रामपंचायत टाकवे खु. (मावळ), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- मांजरवाडी (जुन्नर)
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण लोगोचे, पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेली पालखी सोहळा माहिती पुस्तिका तसेच वारी सुविधा व टॉयलेट सुविधा ॲपचे मंत्री गोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात निर्मल दिंडी, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, मोबाईल व्हॅन, लोककला पथक, संवाद वारी आदी चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्याला पुरस्कार प्राप्त तालुक्याचे गट विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button