प्रशासकीयब्रेकिंग न्युज

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि.२१ : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा, अशा अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीपटुंना पायाभूत सुविधा,प्रशिक्षणासह आवश्यक मदत करण्यात येईल असे आश्वासन आज येथे दिले.

भारतीय कुस्तीगीर महासंघ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, नागपूर शहर कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर येथील विभागीय क्रिडा संकुलात आयोजित ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.त्यावेळी ते बोलत होते.गृह (ग्रामीण)राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संदीप जोशी, आमदार कृपाल तुमाने, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मागील काही वर्षात महाराष्ट्राने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याने गेल्या तीन वर्षात अव्वल कामगिरी केली आहे. कुस्तीतही १५ वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचा दबदबा आहे. मात्र, १५ वर्षावरील वयोगटात राज्याची कामगिरी सुधारण्याची गरज आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देत महाराष्ट्राला सन्मान मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर राज्यातील कुस्तीतून हा बहुमान मिळाला नाही. यापुढे  कुस्तीपटुंनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरते मर्यादित नराहता ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी सर्व स्तरातून पोषक वातावरण होण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनही कस्तीपटुंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व पायाभूत सुविधा देण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले.

कुस्ती हा प्राचीन क्रीडा प्रकार असून रामायण आणि महाभारतामध्येही कुस्तीचे संदर्भ आढळतात. महाराष्ट्राच्या खेडया-पाडयात कुस्ती आणि कबड्डी हा खेळ मोठया प्रमाणात खेळल्या जातो. कोल्हापूर,पुणे,सातारा,अमरावती,नागपूर आदी ठिकाणी कुस्तीचे आखाडे असून तिथेही कुस्ती खेळल्या जाते . आता लाल मातीवरील कुस्ती मॅटवर आली आहे. या खेळातील बदलानुसार खेळाडूंनीही कौशल्य आत्मसात करून उत्तमोत्तम प्रदर्शन करावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कुस्तीच्या सामन्यांचा आनंदही घेतला व विजेत्यांना पदक वितरीत केले.

नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी देशातील २५ राज्यांतून १५ वर्षांखालील स्पर्धक सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण १० वजन गट आहेत. मुलांसाठी ३८ ते ८५ किलो आणि मुलींसाठी ३३ ते ६६ किलो वजन गट आहेत.मुलांच्या फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन तर मुलींच्या फ्रीस्टाईल प्रकारात या स्पर्धा होत आहेत.

००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button