प्रशासकीयब्रेकिंग न्युज

भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय-नेटचे यशस्वी पहिले पाऊल

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २५ : भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) विकसित केलेले ‘इसीआय-नेट’ (ECINET) हे नवे ‘वन-स्टॉप’ डिजिटल व्यासपीठ नुकत्याच पार पडलेल्या पाच विधानसभा पोटनिवडणुकांत (केरळ, गुजरात, पंजाब व पश्चिम बंगाल) पहिल्यांदाच कार्यान्वित केले. केवळ ७२ तासांत निवडणूक ‘इंडेक्स कार्ड’ प्रसिद्ध करण्याची ऐतिहासिक कामगिरीही या प्रणालीद्वारे शक्य झाली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू व डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने ही पुढील पिढीची तंत्रज्ञान–सुविधा आणली आहे. ईसीआय-नेटमध्ये आयोगाच्या ४० हून अधिक पूर्वीच्या वेब व मोबाईल अनुप्रयोगांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे; पुढील काही आठवड्यांत ते सर्व मॉड्यूल्स पूर्णपणे कार्यान्वित होतील.

मतदान टक्केवारी अहवालांत झपाट्याने वेग

या पोटनिवडणुकांत मतदान केंद्राध्यक्ष यांनी (PRO) थेट बूथवरूनच मतदार सहभाग कल (VTR) ट्रेंड्स ईसीआय-नेटवर अपलोड केले. यापूर्वीचा कागदी पद्धतीचा विलंब टाळून, माहिती प्रचंड वेगाने व पारदर्शकपणे सार्वजनिक झाली. PRO यांना बूथ सोडण्यापूर्वीच अंतिम VTR आकडे अपलोड करणे बंधनकारक केल्याने मतदानाची अंदाजित टक्केवारी मतदानदरम्यानच नागरिकांना उपलब्ध झाली.

‘इंडेक्स कार्ड’ ७२ तासांत

५ जून रोजी जाहीर केलेल्या निर्णयानंतर ईसीआय-नेटमुळे इंडेक्स कार्ड तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः डिजिटल झाली; बहुतेक डेटा-क्षेत्रे स्वयंचलितपणे भरली जातात. याआधी ही प्रक्रिया हाताने डेटा भरून सत्यापित करत असल्याने अनेक आठवडे किंवा महिने लागत.

१९८०च्या दशकात सुरू झालेले इंडेक्स कार्ड हे मतदारसंख्या, उमेदवार, पक्षनिहाय मतवाटप, लिंगानुसार मतदान, प्रादेशिक नमुने आदी बहुआयामी माहिती देणारे, महत्त्वाचे सांख्यिकीय दस्तऐवज आहे. संशोधक, माध्यमे व सर्वसामान्यांसाठी ते https://www.eci.gov.in/statistical-reports/ येथील ‘bye-elections’ टॅबमध्ये खुले आहे.

ईसीआय-नेटच्या अंमलबजावणीमुळे वेळेची बचत, सुसूत्रता आणि माहितीची पारदर्शकता यांचे नवीन मानदंड निश्चित झाले आहेत. आगामी निवडणुकांत या प्लॅटफॉर्मच्या सर्व सुविधा पूर्ण क्षमतेने वापरल्या जातील, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button