प्रशासकीयब्रेकिंग न्युज

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि. २६ : पंढरपूर वारीसाठी सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर येथे वाढीव बसगाड्या देण्यात याव्यात. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व बस थांबा परिसरात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश परिवहन, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस विभागाचे सहसचिव रा.मो.होळकर, वाहतूक महाव्यवस्थापक नि. नि. मैंद, उपमहाव्यवस्थापक श्री. बोंबले, महाव्यवस्थापक जयेश बामणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, पूर्ण क्षमतेने बसगाड्या पुरविण्यात याव्यात. कोरोना कालावधीत बंद झालेल्या मार्गिका पुन्हा सुरू करण्यात याव्यात. २५१ बस डेपोपैकी उर्वरित १२ डेपोला गाड्यांचे वितरण करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी. सार्वजनिक –खासगी भागीदारीवर डेपो देण्यासाठी वापर, परतावा याबाबतचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करावे. डेपो अंतर्गत स्वच्छतागृह, विश्रामगृह व तृतीयपंथी यांच्यासाठी असलेल्या सुविधांची पाहणी करावी आणि त्या उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी.

प्रवाशांच्या व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सर्व आगार, बस स्थानके, विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यालय, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था व मध्यवर्ती कार्यशाळा अशा सुमारे ६५० ठिकाणी नवीन सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासंदर्भात योग्य निकष वापरून कार्यवाही करावी, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

नवीन २६४० पैकी १६६९ वाहनांचे वितरण करण्यात आले आहे. तीन हजार अत्याधुनिक उपकरणांसह नवीन वाहने खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

श्रध्दा मेश्राम/वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button