प्रशासकीयब्रेकिंग न्युज

श्री क्षेत्र कौंडण्यपूर शक्तिपीठ महामार्गाला जोडणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. २७ (जिमाका) :शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपर्यंत जाणार आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रीक्षेत्र कौंडण्यपुरला जाण्याची सुविधा निर्माण व्हावी, या श्रीक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे शक्तिपीठ पुढील काळात महामार्गाला जोडण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला.

श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वर्दीनी नदीचे (वर्धा नदी) पूजन करून 211 मीटरची अखंड साडी नदीला अर्पण केली. ही साडी सूरत येथे तयार करण्यात आली. नदीला आपल्या भारतीय संस्कृतीत माता मानतात. मातेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून हा सोहळा साजरा करण्यात आला.

आमदार राजेश वानखडे, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, सुमीत वानखडे, दादाराव केचे, प्रवीण पोटे-पाटील, शेखर भोयर, रविराज देशमुख, किरण पातुरकर, राज राजेश्वर माऊली सरकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे  श्रीक्षेत्र विदर्भाची पंढरी, भगवान श्रीकृष्णाचे सासर तसेच माता रुख्मिणीचे व पंच सतीचे माहेरघर म्हणून सर्वश्रृत आहे.  ही भूमी अत्यंत पवित्र आहे. या भूमीला पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. विठू रुख्मिणी मातेचे पूजन करून मला अधिक सकारात्मकतेने कार्य करण्याचे ऊर्जा मिळाली आहे. या आशीर्वादाने माझे जनसेवेचे कार्य अव्याहतपणे सुरू राहील.

ते पुढे म्हणाले, हे शासन लाडक्या बहिणी व शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर राहील. अमरावती जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. श्री क्षेत्र कौंढण्यपूरचा विकास करण्यासाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून येथील विकासकामे सुरु करण्यात येईल,असेही ते यावेळी म्हणाले.

अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव व विठ्ठल रुख्मिणी संस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल रुख्मिणी रथयात्रा, नगर प्रदक्षिणा, एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिला भजनी मंडळाच्या शंभरहून अधिक दिंड्या सामील झाल्या होत्या. भक्तिमय वातावरणात विठु रखमाईचा जयघोष करीत, टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक भक्तगण, वारकरी, ग्रामस्थ यात सामील झाले होते.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button