प्रशासकीयब्रेकिंग न्युज

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आठवडा विशेष टीम―

पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश

 सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाने प्रभावी व परिणामकारक प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पोलीस मुख्यालय येथे आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, महापालिका अतिरीक्त आयुक्त रवीकांत आडसूळ, सांगलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम] मिरजचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेऊन, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करून देण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासन व पोलीस दलाला यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे घरगुती व अन्य गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजनांसाठी विचारमंथन करावे. हद्दपार गुन्हेगार व जामिनावर सुटलेल्यांवर नजर ठेवावी. संशयित हालचालींबाबत माहिती देण्यासाठी पोलीस दलाने गुप्त माहिती संकलन यंत्रणा अधिक बळकट करावी. पोलीस दादा व पोलीस दीदींना घरोघरी नागरिकांशी प्रभावी संवाद साधत प्रबोधनात्मक जनजागृती व समुपदेशन करावे, असे त्यांनी सूचित केले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नागरिकांत पोलिसांबद्दल सकारात्मक भावना निर्माण करावी. महिला व मुलींसाठी हेल्पलाईनबाबत प्रचार प्रसिद्धी करावी. शाळा–कॉलेजांमध्ये जनजागृती कार्यक्रम घ्यावेत. सायबर गुन्हेगारी, अमली पदार्थ, बालसुरक्षा याबाबत विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधून प्रशिक्षण द्यावे. समाजमाध्यमांवर निगराणी ठेवावी आणि त्याचा जबाबदारीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी. गुन्हेगारी रोखण्यामध्ये प्रशासन, पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रभावी उपाययोजना राबवून दिशादर्शक काम करावे, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत सादरीकरण करताना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची माहिती देऊन सर्व महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले असल्याचे सांगितले.

यावेळी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस विभागाने तयार केलेल्या जनजागृती लघुचित्रफितीचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button