बीड:आठवडा विशेष टीम―राज्यातील वंजारी समाजाची सध्याची लोकसंख्या २ टक्क्यांवरून १० टक्के टक्क्यांवर असून राज्य सरकारने १० टक्के आरक्षण दिले तर त्यांचे आम्ही स्वागतच करू,अन्यथा आमच्या हक्काच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांशी टोकाचा संघर्ष करण्यासही वंजारी समाज तयार असल्याचा इशारा वंजारी आरक्षण कृती समितीनं दिला आहे.
याचाच एक भाग म्हणून दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बीड शहरात वंजारी आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे.
यवन आक्रमणाला कंटाळून इसवीसनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थानमधून वंजारी समाज महाराष्ट्रात आला.समाजातील ८० टक्के नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत.त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये ही वंजारी समाजातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.बीड सह राज्यातील इतर जिल्ह्यांमधून वंजारी समाज मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यासह पर राज्यामध्ये ऊस तोडणीस जातो.वर्षानुवर्षे शेती आणि ऊस तोडणी करूनही समाजाची स्थिती बदललेली नाही.तसेच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या समाज मागासलेला आहे.समाजाला ओळख आणि एकजूट करण्याचे काम राष्ट्रसंत भगवान बाबा,ह.भ.प वामनभाऊ महाराज आणि त्यानंतर स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केले.
समाजाला आता वाढीव आरक्षणाची गरज असून दोन टक्क्यांवरून १० टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी वंजारी आरक्षण मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि राज्यातील वंजारी समाजाच्या लोकप्रतिनिधीना समाजाच्या मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.राज्य सरकारने वाढीव आरक्षण दिले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू,मात्र दिले नाही तर सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्यासही वंजारी समाज तयार आहे.आमच्या मागण्यांचा राज्य सरकारने सहानभूतीपूर्वक विचार करावा.शिवाय वाढीव आरक्षणाचा लढा हा कोणाच्याही विरोधात नसून तो समाजाच्या हितासाठी आहे.त्यामुळे समाजातील सर्व घटक वंजारी आरक्षण कृती समितीच्या सोबत आहेत.येणाऱ्या काळात आरक्षण लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूकीवर ३५० ग्रामपंचायतीचा बहिष्कार टाकण्याचा ठराव
वंजारी समाजाचे कमी केलेले आरक्षण आमचे आम्हाला पूर्णपणे द्यावे,विशेषतः हे आरक्षण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्यात यावे.अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा ३५० ग्रामपंचायत ने एकमुखी ठराव घेऊन दिला आहे.आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभर विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
वंजारी आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरात विशेष बैठका घेण्यात येत आहेत.दरम्यान राज्यात वंजारी आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले असून समाजातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी , कर्मचारी , नेते या आंदोलनामध्ये सहभागी होत असून त्या त्या ठिकाणी जेष्ठ नागरिक आंदोलकांना मार्गदर्शन करीत आहेत.मार्गदर्शन करणारे जेष्ठ नागरिक सदरील आंदोलन अत्यंत शांत आणि संयमाने करण्याचे आवाहन करत असून आजपर्यंत झालेल्या विविध बैठका या अत्यंत शांततेत आणि संयमाने पार पडल्या आहेत.हाच आदर्श आंदोलन करताना देखील वंजारी समाज बांधव बाळगतील अशी अपेक्षा वंजारी आरक्षण कृती समितीच्यावतीने समन्वयकांनी केली आहे.