प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया

आठवडा विशेष टीम―

मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे निर्देश अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलावर्धन राव यांनी दिले.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलावर्धन राव यांनी राज्यातील अन्न सुरक्षा अंमलबजावणीचा नुकताच सविस्तर आढावा घेतला. ही आढावा बैठक  FSSAI च्या प्रशिक्षण व क्षमता विकास संस्थेतील इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग ऑफ कंझ्युमर फूड सेफ्टी अँड अप्लाइड न्यूट्रिशन (ITCFSAN) येथे  झाली. बैठकीस अन्न सुरक्षा आयुक्त राजेश  नार्वेकर, ठाणे व कोकण विभागातील सह आयुक्त (अन्न), परवाना प्राधिकारी, न्यायनिर्णय अधिकारी, तसेच पश्चिम विभागीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण संचालक प्रीती चौधरी यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अन्न सुरक्षेच्या उच्चतम मानकांचे पालन हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे सांगून पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर (PDW) युनिट्सची १०० टक्के तपासणी सुनिश्चित करण्याचे  श्री. राव सांगितले. तसेच सहा महिन्यांतून एकदा PDW युनिट्सच्या अनुपालन तपासणीस भर द्यावा, असेही ते म्हणाले.

ईट राईट इंडियाउपक्रमाचे कौतुक

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणच्या ‘ईट राईट इंडिया’ उपक्रमांतर्गत  महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबवण्यात आलेल्या रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांच्या तपासणी मोहिमांचे  श्री. राव यांनी यावेळी विशेष कौतुक करून अंगणवाडी सेविका व स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी घेण्यात आलेल्या FoSTaC प्रशिक्षणाच्या माध्यमातून अन्न सुरक्षेच्या जनजागृतीचे अनुकरणीय उदाहरण महाराष्ट्राने निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. या मॉडेलचा देशपातळीवर प्रसार करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.

अन्न सुरक्षा चाचणीसाठी नवीन मोबाईल फूड टेस्टिंग वाहन तत्काळ कार्यान्वित करावीत, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘तेल वापरात १० टक्के कपात’ या आवाहनाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन श्री. राव यांनी यावेळी केले.

अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी सांगितले, राज्यातील अन्न सुरक्षा अंमलबजावणी यंत्रणेला बळकटी देण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिनी १९४ नवीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवरील तपासणी व निरीक्षण कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.  ‘ईट राईट प्लेस ऑफ वर्शिप’ सन्मान स्वामी समर्थ ट्रस्ट व शिर्डी साईबाबा संस्थान यांना देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर भक्तगणांना अन्न पुरविणाऱ्या धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून ही मान्यता महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button