प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

आठवडा विशेष टीम―




मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय आंब्याची विक्रमी निर्यात करण्यासाठी, निर्यातक्षम फळे विशेषतः आंब्यांची गुणवत्ता सुनिश्चित करावी. गेल्या वर्षी या सुविधा केंद्रातून विक्रमी आंबा निर्यात करण्यात आला आहे. आणखी निर्यात वाढवून याचा फायदा शेतकऱ्यांना मिळून देण्यासाठी, यापुढे आठ तासाच्या तीन शिफ्ट मध्ये हे विकिरण सुविधा केंद्र पूर्ण क्षमतेने आणि जबाबदारीने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल बोलत होते. ‘विकिरण’ केंद्राच्या कार्यपद्धती, अडचणी आणि निर्यातीत निर्माण झालेल्या अडथळ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. दिवेगावकर, पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनय कोकरे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री रावल म्हणाले की, अमेरिकेसह अनेक देशात भारताच्या आंब्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. म्हणून जागतिक बाजारपेठेमध्ये दर्जेदार फळांची निर्यात करण्यासाठी विकिरण सुविधा केंद्र हे आठ-आठ तासाच्या तीन शिफ्टमध्ये चालवण्यात यावे. त्या आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी अपेडाच्या माध्यमातून दोन निरीक्षक नेमण्याच्या संदर्भात अमेरिकेच्या अधिकाऱ्याला सांगण्यात यावे. हे सुविधा केंद्र जेव्हा फक्त आठ तास चालत होते त्यावेळी 900 मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. या वर्षी 12 तास चालवण्यात आले, तेव्हा विक्रमी 2100 मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. आता आठ तासाच्या तीन शिफ्ट मध्ये जर हे सुविधा केंद्र कार्यान्वित ठेवण्यात आले तर विक्रमी आंबा तसेच फळांची निर्यात आपण करू शकतो. यासाठी रेडिएशन सेफ्टी ऑफिसर, प्लांट ऑपरेटर, डोझीमेट्रीस्ट आणि तांत्रिक कर्मचारी वाढविण्यात यावेत. वितरण साखळीतील अडथळे दूर करण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेची कार्यपद्धती (SOP) काटेकोरपणे पाळावी, असे मंत्री रावल यांनी सांगितले.

दि. ८ व ९ मे २०२५ रोजी झालेल्या त्रुटींमुळे १० निर्यातदारांच्या  १५ कन्साईनमेंट्स आंबे अमेरिका येथे  रोखण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. आंबा निर्यात ही महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून अशा अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळू नये, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button