प्रशासकीयब्रेकिंग न्युज

मत्स्यव्यवसायात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर

आठवडा विशेष टीम―


मुंबई, दि. ८ : महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या युगात प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या मदतीने जलाशयांचे व्यवस्थापन, मत्स्यसंवर्धन आणि माहिती संकलनासाठी ‘स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम’ (Smart Fish Stock Assessment System – SFSS) तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.

या करारावर स्वाक्षरीचा कार्यक्रम ८ जुलै २०२५ रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. मार्वल या शासकीय कंपनीसोबत झालेल्या या करारामुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. यावेळी पदुम विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे तसेच मार्वल कंपनीचे संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या करारानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून जलाशयांची माहिती व त्यांचे सर्वेक्षण, मत्स्य उत्पादनाची अचूक आकडेवारी तयार करणे, मच्छींच्या साठ्याचे परीक्षण (Stock Assessment), विविध प्रकारच्या माहितीचे डिजिटल संकलन, मच्छीमारांना माहिती व सल्ला देणाऱ्या प्रणालींचा विकास या सर्व गोष्टी अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम

कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित ‘स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम’ हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात प्रथमच राबविण्यात येणार आहे. यामुळे जलाशयांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल तसेच शाश्वत मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने धोरणे आखणे सुलभ होईल.

या उपक्रमामुळे मच्छीमारांना योग्य मार्गदर्शन मिळणार असून, उत्पादन वाढीबरोबरच जलसंपत्तीचे संवर्धनही साधता येणार आहे. मत्स्यव्यवसायामध्ये विज्ञानाधारित निर्णय प्रक्रिया राबवण्याची ही महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. यामुळे पारंपरिक मत्स्यव्यवसायाला नवे बळ मिळेल आणि शेतकरी व मच्छीमारांना आधुनिक व्यवस्थापनाची जोड मिळेल.”

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button