खेळीमेळीच्या वातावरणात अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
अंबाजोगाई:आठवडा विशेष टिम― राज्याच्या अर्थकारणात अल्पावधीत नावारूपास आलेल्या व सहकार क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने सामान्य माणसाचा विश्वास संपादन केला आहे.अंबाजोगाईच्या सर्वांगिण विकासाला व अर्थकारणाला बँकेमुळे गती मिळाली आहे. बँकेच्या माध्यमातून सभासद,ठेवीदारांच्या विश्वासास पात्र राहुन अंबाजोगाईचा नावलौकिक राज्यात वाढविणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी केले. ते बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
21 सप्टेंबर शनिवार रोजी अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी,संचालक सर्वश्री प्रा.वसंतराव चव्हाण,अॅड.विष्णुपंत सोळंके,दत्तात्रय दमकोंडवार,अरूणराव काळे,पुरूषोत्तम चोकडा,हाजी शेख मेहमुद शेख दादामियाँ, सौ.रोहिणी पाठक, सचिन बेंबडे,बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय जड आदींची उपस्थिती होती.मागील इतिवृत्ताचे वाचन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय जड यांनी केले.प्रारंभी ग्रामदैवत माता योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की,25 वर्षांपुर्वी अंबाजोगाईला हक्काची बँक नव्हती.म्हणून प्रारंभी योगेश्वरी पतसंस्था सुरू करावी लागली.पुढे रिझर्व्ह बँकेने व शासनाने मंजुरी दिल्यानंतर पिपल्स बँकेची उभारणी केली. एनपीए शुन्य टक्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयासह 16 शाखा व दोन विस्तारीत कक्षांसह कार्यरत आहेत.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासहित राज्याच्या अर्थकारणात अल्पावधीत नावारूपास आलेल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने सहकार क्षेत्रात सातत्याने चांगली कामगिरी करत ग्राहकांचा,सभासदांचा, ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे.या विश्वासाच्या बळावरच सहकारात बँक अग्रेसर ठरली आहे असे चेअरमन राजकिशोर मोदी म्हणाले.
31 मार्च 2019 अखेर आपल्या सर्वांच्या सहकार्याने बँकेने 345 कोटी 92 लक्ष रूपयांच्या ठेवी जमविल्या आहेत. तसेच बँकेकडे 10629 सभासद तर वसुल भागभांडवल 10 कोटी 10 लाख,स्वनिधी 25 कोटी 90 लाख,एकुण गुंतवणूक 169 कोटी 90 लक्ष तर कर्ज वाटप 185 कोटी 34 लाख इतके असून बँकेस 31 मार्च 2019 अखेर 2 कोटी 5 लाख रूपये इतका नफा झाला आहे. स्थापनेपासुन बँकेस लेखापरिक्षणाचा ऑडीट ‘अ’ वर्ग मिळाला असल्याचे सांगुन कोअर बँकींगद्वारे शाखांची जोडणी केली आहे.सर्व बँकांतील सेवा रूपेकार्ड व इन्स्टा कार्ड एटीएमद्वारे ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते.सर्व शाखा व मुख्य कार्यालय संपुर्णपणे कोअर बँकींग व संगणकीयकृत आहे. सेफ डिपॉझीट लॉकरची सुविधा,भारतात प्रमुख शहरांमध्ये देय डी.डी.ची सुविधा,एस.एम.एस. बँकींग सुविधा,आर.टी. जी.एस.,एनईएफटी सुविधा,बॅलंन्स इनक्वायरीसाठी संपर्क क्रमांक सुविधा,
नॅशनल अॅटोमेटेड क्लेरींग हाऊस,तात्काळ सोने तारण कर्ज,ठेव विमा योजनेतर्गंत विमा संरक्षण,ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवीवर अर्धा टक्का जादा व्याज,तत्पर व विनंम्र सेवा,सायंकालीन सेवा ही अंबाजोगाई पिपल्स बँकेची वैशिष्ट्ये आहेत. अंबाजोगाई,विस्तारीत कक्ष (अंबाजोगाई), सिरसाळा,बीड,सिडको (औरंगाबाद),जालना, उस्मानपुरा(औरंगाबाद), अहमदनगर,औसा, कळंब,उदगीर, जामखेड,गेवराई,माजलगाव, जोगाईवाडी (अंबाजोगाई),लातूर वाघोली (पुणे),आणि विस्तारित कक्ष जोगाईवाडी या ठिकाणी बँकेच्या शाखा आहेत. ग्राहक हेच दैवत मानून ग्राहक सेवा हीच आमची भक्ती असल्याचे ब्रिद वाक्य घेवून नवउद्योजक व महिला भगिनींना बँकेच्या वतीने सर्वतोपरी कर्जसहाय्य केले जात आहे. अंबाजोगाईचे अर्थकारण गतिमान करण्यासाठी पुढील काळातही सर्वांना सोबत घेवून आर्थिक समृद्धीच्या प्रवाहात वंचित व दुर्लक्षित घटकांना सोबत घेणार आहोत.1996 साली लावलेल्या पिपल्स बँकेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी सभासदांच्या वतीने जनार्धनराव जगताप, दिनकर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेत सर्व ठरावांना उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.आनंद टाकळकर यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार संचालक प्रा.रोहिणी पाठक यांनी मानले. यावेळी सभासदांनी मांडलेल्या सुचनांचे चेअरमन राजकिशोर मोदी,संचालक व सभागृहाने स्वागत केले. तर मान्यवरांसहीत काश्मिर सिमेवर शहीद झालेल्या सैनिकांना, संशोधक,शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ,लेखक,कलावंत, नैसर्गिक दुैघटनेेतील मृतात्मे,सामाजिक कार्यकर्ते,बँकेचे सभासद,ज्ञात अज्ञात सर्वांना सभागृहाने श्रद्धांजली अर्पण केली.
या सभेसाठी सभागृहात बीड जिल्हा बँकेचे संचालक हिंदुलाल काकडे, नगरसेवक आसेफोद्दीन खतीब,अर्जुनराव थोरात,डॉ.डी.एच. थोरात,डॉ.सोपान पाटील,अॅड.चिखलीकर,राणा चव्हाण,औदुंबर मोरे,विलास जाधव यांच्यासहित बँकेचे सभासद, खातेदार,ठेवीदार, हितचिंतक,पत्रकार, व्यापारी,नागरिक, महिला भगिनी,डॉक्टर, वकिल मंडळी,सहकार क्षेत्रातील अधिकारी, मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.