परळी दि.२२:आठवडा विशेष टीम― ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर लि. पांगरी कारखान्यातील कर्मचार्यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. कुटुंबियांसमवेत भर पावसात उपोषण सुरू असताना अनेक कर्मचारी प्रकृती ढासळल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले असताना ही निष्ठूर प्रशासन उपोषणाची दखल घेत नसल्याने कर्मचारी कुटुंबियांसमवेतच कारखान्याचे सभासद शेतकर्यांमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे.
वैद्यनाथ कारखान्यात अहोरात्र झटणार्या कर्मचार्यांचे मागील 13 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत, 18 महिन्यांपासून या कर्मचार्यांची पी.एफ. आणि अंशदानाची रक्कम परस्पर हडप करून ती संबंधित विभागाला न भरणा करून शासनाची ही फसवणूक केल आहे. या शिवाय 2 वर्षापासून या कर्मचार्यांना रेटेन्शन अलाऊंस ही दिलेला नाही, त्यामुळे या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि उपचारासाठी ही पैसे नसल्याने त्यांची अबाळ होत आहे. त्यामुळे जवळपास 200 कर्मचार्यांनी मागील 5 दिवसांपासून कारखान्यासमोर उपोषण सुरू केले आहे. मात्र या उपोषणाची साधी दखल ही कारखान्याच्या चेअरमन असलेल्या पालकमंत्र्यांना घ्यावी वाटलेली नाही. या उपोषणात मागील 2 दिवसांपासून या कर्मचार्यांचे कुटुंबिय आपल्या मुलांसह उपोषणाला बसले आहेत. सद्या सुरू असलेल्या भर पावसात ही हे उपोषण सुरू असताना कारखाना प्रशासन एक ही मागणी मान्य करण्यास तयार नसल्याने आता कर्मचार्यांसोबतच सभासद शेतकरी आणि नागरिकांमध्ये ही संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या कर्मचार्यांची साखर आयुक्त, कामगार आयुक्तांकडे ही उपोषणाबाबत तक्रार केली असून, जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे.