दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून दीनदयाळ बँक ग्राहकांना दर्जेदार सेवा देत आहे.भारतीय बील पेंमेंट (बी.बी.पी.एस) सारख्या नव्या सुविधा बँक ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. ग्राहकांना दर्जेदार,तत्पर सेवा व सुविधा दिल्या जातात.आरबीआयच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत कर्ज वाटप करण्यात येते त्यामुळे गरजू सभासदांना बँकेच्या माध्यमातून आवश्यक निधीची मदत केली जाते.आर.बी. आय.च्या धोरणातील बदलांमुळे नविन शाखा मिळत नाहीत असे सांगुन कर्जदारांनी कर्ज परतावा नियमित करावा ते सभासदाचे कर्तव्य आहे.पं.दीनदयाळजी उपाध्याय यांच्या अर्थसिद्धांतावर बँकेची वेगाने प्रगती आणि विस्तार होत असल्याची माहिती देवून सभासदांना बँकेच्या वतीने 9 टक्के लाभांश जाहिर करण्यात आला. कर्ज हप्ते नियमित भरून सहकार्य करावे असे आवाहन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई हेबाळकर यांनी केले. त्या बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या.
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,दि.22 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता येथील स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृह,खोलेश्वर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.प्रारंभी बँकेच्या अध्यक्षा सौ. शरयुताई हेबाळकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भुषवावे असे सुचक म्हणून बँकेचे सभासद अंगद विश्वनाथ राख यांनी सुचविले.त्याला बँकेचे सभासद रविंद्र माणिकराव पुराणिक यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभेचे अध्यक्षस्थान बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई हेबाळकर यांनी स्विकारले.तर यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार कोपले,संचालक सर्वश्री रा.गो.धाट,डॉ.दि.ज. दंडे,गौतमचंद सोळंकी, पुरूषोत्तम भुतडा,अॅड. राजेश्वर देशमुख,बिपीन क्षीरसागर,अॅड.मकरंद पत्की,जयवंत ईटकुरकर (कुलकर्णी),चैनसुख जाजू,राजाभाऊ दहिवाळ,गोविंद कुडके, प्राचार्य किसन पवार, अॅड.अशोक कुलकर्णी, बँकेच्या तीन शाखेतील सन्मानीय सल्लगार अनिलसेठ पदुकोण, मयुरसेठ शुक्ला (देगलुर),बी.एस.
देशपांडे (माजलगाव) आणि डॉ.महादेव रूद्राक्ष (परळी) आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व पं. दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमापुजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.बँकेच्या अध्यक्षा शरयुताई हेबाळकर व उपाध्यक्ष विजयकुमार कोपले यांचे स्वागत मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी तर सर्व सन्माननिय संचालकांचे स्वागत बँकेचे अधिकारी,शाखाधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत समारंभाचे सुञसंचालन मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी केले. यावेळी आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीत निधन पावलेले थोर नेते, संशोधक,शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ,लेखक,साहित्यिक, कलावंत, शिक्षणतज्ञ,भारतमातेचे रक्षण करताना शहीद झालेले सैनिक,नैसर्गिक दुर्घटनेतील मृतात्मे, सामाजिक कार्यकर्ते, बँकेचे सभासद, कर्मचारी,हितचिंतक, खातेदार मरण पावलेले सर्व कर्मचारी,ज्ञात व अज्ञात अशा सर्वांनाच सभागृहाने दोन मिनीटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली. अध्यक्षीय सुचनेनंतर कामकाज सुरू झाले. उपस्थित संचालकांनी विषय पत्रिकेमधील विषयांचे वाचन केले व सभागृहासमोर ठरावांचे ही वाचन करण्यात आले.या सर्व ठरावांना टाळ्यांच्या गजरात सभागृहाने मान्यता दिली.बँकेच्या प्रगतीचा विस्तृत तपशील आणि सांख्यिकीय माहिती सभासदांना देण्यात आली.सभागृहामध्ये बँकेचा 23 वा वार्षीक अहवाल सभेसमोर ठेवण्यात आला. बँकेच्या प्रगतीचा आलेख तथा विस्तृत सांख्यकिय माहितीचा तपशील व सर्व आढावा प्रोजेक्टरवर प्रदर्शीत (पी.पी.टी.) करून दाखविण्यात आला.या प्रसंगी बँकेचे संचालक डॉ.हरिश्चंद वंगे यांनी बँकेच्या प्रगती बाबत संचालक मंडळाचे अभिनंदन केले.बँकेच्या अध्यक्षा शरयुताई शरदराव हेबाळकर यांनी समारोपपर भाषणात सांगितले की,‘विश्वास,विकास व विनम्रता’ हे ब्रीद आपला परीचय आहे.याच ञिसुञीनुसार बँकेची गेली 22 वर्षे समाधानकारक वाटचाल सुरू आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने,सदिच्छेने व सक्रिय शुभेच्छांनी बँक 22 वर्षांचा कार्यकाळ प्रगतीचे मार्ग प्रशस्त करीत वाटचाल करते आहे.सभासदांना (9 टक्के) इतका लाभांश देत असल्याचे सांगताच उपस्थित सभासदांनी या घोषणेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. 22 वर्षांत बँकेने आर्थिक,भौगोलीक, सांख्यकिय प्रगती केली. आरबीआयच्या सर्व निकषांची पुर्तता बँकेने केलेली आहे.त्यामुळे बँकेस सुरूवातीपासुन लेखापरिक्षण ‘अ’ वर्ग मिळाला असून तो अबाधित आहे.बँक गतवर्षी पासून आधुनिक तंञज्ञानाचे सहाय्याने विविध सेवा जसे भारत बील पेमेंट (बी.बी.पी.एस.) या नविन जमान्यातील सुविधांचा समावेश आहे.सोबतच कर्ज व्यवहार अधिक सुलभ व विविध उद्देशांकरीता विस्तारीत केला आहे. उत्तम कर्मचारी हा संस्थेचा आधारस्तंभ हे लक्षात घेवून सतत सातत्याने प्रशिक्षणातून कौशल्य वृध्दीकडे मा.संचालक मंडळ विशेष लक्ष ठेवून आहे. सामाजिक भान हा आपल्या संस्थेचा मुळ गाभा आहे.त्यामुळे दरवर्षी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.हे सांगुन सौ. शरयूताई हेबाळकर म्हणाल्या की, तंत्रज्ञानातील बदल स्विकारत अल्पावधीतच बँक ग्राहकांपर्यंत दर्जेदार सेवा व अत्याधुनिक सुविधा पोहोचविण्याचा संचालक मंडळ अटोकाट प्रयत्न करीत असल्याचे सौ.हेबाळकर यांनी सांगुन 22 वे वर्ष संपताना बँकेने भौतिक स्तरावर 495 कोटींहून अधिक एकूण व्यवसायाचा टप्पा पुर्ण केला आहे.बँकेच्या यशात सर्व सभासद, कर्जदार,ठेवीदार या सर्वांचे सहकार्य असल्याची माहिती देवून त्यांनी यावेळी पं.दीनदयाळजी यांच्या एकात्ममानव दर्शनचा पुरस्कार केला अशी माहिती हेबाळकर यांनी दिली.या सभेत जनार्धन मुंडे,डॉ.हरिश्चंद्र वंगे, प्रा.रामकृष्ण देवशटवार, विलास खाडे या सभासदांनी सभेच्या कामकाजात विविध प्रश्न उपस्थित केले.त्या सर्व प्रश्नांना मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी सकारात्मक उत्तरे देवून सभासदांचे समाधान केले.साक्षी दुरकर हिने वैयक्तिक पद्य सादर केले.तर सभेचे सुत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी करून यावेळी प्रार्थना तसेच एकात्मता मंत्राचे पठण बँकेचे संचालक जयवंत इटकुरकर यांनी करून उपस्थितांचे आभार संचालक प्राचार्य किसन पवार यांनी मानले. बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेच्या यशस्वितेसाठी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक प्रदीपकुमार देशमुख व इतर सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी पुढाकार घेतला.
दीनदयाळ बँकेच्या प्रगतीचा आलेख
31 मार्च 2019 अखेर बँकेकडे ठेवी- 31529.05 (लाख)., सभासद संख्या 11500.,वसुल भाग भांडवल-944.93 (लाख).,कर्ज वाटप -18024.47 (लाख)., गुंतवणुक-14223.04 (लाख) असुन बँकेस करपश्चात 156.74 (लाख) एवढा निव्वळ नफा झाला आहे. मुख्यालयासह बँकेच्या एकुण (17+1) शाखा आहेत.
शाखा मानांकन व गौरव
बँकेच्या उत्तम ग्राहक सेवा देणार्या शाखांचा गौरव व मानांकन बँकेची व्यवसायवृध्दी, परिणामी बँकेचा आर्थिक विकास व सर्वांगिण विकास होण्यासाठी शाखा स्तरांवरील कामकाजास प्रगतीच्या दृष्टीकोनातून स्पर्धात्मक स्वरूप यावे, तसेच उत्तम प्रगती केलेल्या शाखांना प्रोत्साहन व इतर शाखांना प्रेरणा मिळावी यासाठी बँकेने अंतर्गत आर्थिक निकष निश्चित करून दिनांक 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या आर्थिक वर्षातील बँकेच्या सर्व शाखेंच्या (16) निकषांधारीत विश्लेषणानंतर शाखेचे मुल्यांकन करून प्राप्त गुणांच्या आधारे बँकेच्या शाखांना प्रथम,द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर चतुर्थ हे मानांकन प्रदान केले जाते.त्यानुसार दीनदयाळ बँकेच्या त्या मानांकित शाखा अशा 1) परळी रोड शाखा (प्रथम),2) देगलूर शाखा आणि परतूर शाखा (द्वितीय) तर 3) माजलगाव शाखा (तृतीय) या सदर शाखांना रोख पारीतोषिक व सन्मानचिन्ह देवून संचालक मंडळाच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पारीतोषिक वितरण समारंभाचे सुञसंचालन प्रतिभा गोस्वामी यांनी केले.