कार्यक्रमबीड जिल्हामनोरंजनसामाजिक

“कुणबटांच्या जिंदगी चे हाल झाले,देह त्यांचे बोलते कंकाल झाले,दावणीचे जीव गेले छावणीला, कालचे ‘राजे’ किती कंगाल झाले"-सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम

कवी आणि कविता समजून घेण्यासाठी ‘काव्यसिंधु' संमेलन-प्रख्यात कवी दिनकर जोशी

आठवडा विशेष|प्रतिनिधी
अंबाजोगाई :काव्यसिंधू राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या आयोजनाबाबत बोलताना सांगितले की,संयोजक राजकिशोर मोदी यांचे पुढाकाराने बिना
चेह-यांची माणसे एकञ जमवायची,एकमेकांशी मुक्त संवाद साधायचा, परस्परांना जाणून घ्यायचे,त्यांचे साहित्यानुभव ऐकायचे, आद्यकवि मुकूंदराज यांचेमुळे कवितेची जुळलेली नाळ कायम ठेवून भौतिकता टाळून साधेपणाने कवि आणि त्याची कविता समजून घेण्याचा हा कवितेचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी क्रिडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी यांनी केले.

अंबाजोगाईत महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींची पाच कवी संमेलने झाली.यासाठी प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाने पुढाकार घेतला होता.येथील आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील कवींचे काव्यसिंधू हे राज्यस्तरीय कवी संमेलन रविवार,दि.27 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत नगर परिषदेच्या लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात संपन्न झाले.

काव्यसिंधू हे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे उदघाटन प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी,प्रख्यात कवि प्रभाकर साळेगावकर (माजलगांव),कादंबरीकार रचना स्वामी (अहमदनगर) यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व आद्यकवि मुकूंदराज स्वामी यांच्या प्रतिमापुजनाने झाले. उदघाटन सञात सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांनी प्रास्ताविक केले.तर प्रख्यात कवि प्रभाकर साळेगावकर (माजलगांव), प्रा.महेबूब सय्यद (अहमदनगर), कादंबरीकार रचना स्वामी (अहमदनगर), अजय खडसे (अमरावती), प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे, प्रा.भगवान शिंदे (अंबाजोगाई) यांनी मनोगत व्यक्त केले.आद्यकवी मुकुंदराज यांचा वारसा सांगणार्‍या अंबाजोगाईमध्ये आद्यकवींच्या यात्रेनिमित्त काव्यसिंधू या महाराष्ट्रातील कवींच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील कवींचे एकूण 5 कवी संमेलने झाली. या प्रत्येक कविसंमेलनाला काव्य सरिता असे संबोधण्यात आले होते.प्रारंभी काव्यसरिता-1 हे महिलांचे स्वतंत्र कवी संमेलन झाले.या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रचना स्वामी (अहमदनगर) या तर कविसंमेलनात रचना स्वामी यांनी (हे रामा),अनिता देशपांडे (काळवंडलेला चेहरा), तेजस्वी आमले (वादळ),शितल बोधले (तुझी कहाणी झाली रे),माया तळणकर(माय मराठी),उषा ठाकूर (आई देवाहून थोर), मिनाक्षी देशमुख (स्ञी जन्माची कहाणी), संध्या सोळंके शिंदे(माझी प्रतिभा), अंजना भंडारी (शर्यत) वैशाली तोडकर (शेतकरी) आदी कविता सादर करून या कवियित्रींनी शेती, शेतकरी,स्ञी, समाजव्यवस्था,संस्कृति,माय मराठी,आरक्षण आदींसह विविध ज्वलंत व वास्तववादी विषयांवर मौलिक भाष्य करून सभागृहाला मंञमुग्ध केले.महाराष्ट्राच्या विविध भागातून येत उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. काव्यसरीता-1 या कवि संमेलनाचे बहारदार सुत्रसंचालन अंजना भंडारी व शितल बोधले यांनी केले.तर काव्यसरिता - 2 (पश्चिम महाराष्ट्र) -या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अजय खडसे हे उपस्थित होते.तर यात जनार्धन देवरे,संतोष कांबळे, लक्ष्मीकांत कोतकर, राजेंद्र दिघे,चंदु पाखरे, युवराज जगताप,अनंत कराड या कवींचा सहभाग होता.तसेच काव्यसरिता - 3 (उत्तर महाराष्ट्र) - या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर साळेगांवकर हे होते.तर यात श्रावण गिरी, स.दा.सपकाळे,मोहन राठोड,प्रा.भगवान शिंदे,
मारूती मुंडे,अनुरथ वाघमारे,विठ्ठलराव जोंधळे,शरद हयातनगरकर,
राजेसाहेब कदम,
किरण कदम,भाग्यश्री लुगडे,विजय मस्के, योगेश शेटे,सौरभ घाडगे या कवींचा सहभाग होता.या संमेलनाचे बहारदार सुत्रसंचालन प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे यांनी केले.आणि काव्य सरिता - 4 (मराठवाडा) व काव्य सरिता - 5 (अंबाजोगाई) हे दोन्ही संमेलने एकञच झाली. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवान शिंदे हे होते. यावेळी राजेसाहेब कदम (अहमदपुर) यांनी
“कुणबटांच्या जिंदगीचे हाल झाले,देह त्यांचे बोलते कंकाल झाले
दावणीचे जीव गेले छावणीला,कालचे ‘राजे’ किती कंगाल झाले."
या गझलेतून शेतकर्‍यांचे वास्तव जीवन व व्यवस्थेचे दुष्ट चक्र सभागृहासमोर ठेवले उपस्थित रसिक श्रोत्यांनी कदम यांच्या गझलेला उत्स्फुर्त दाद दिली.तसेच ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर, डॉ.अजय खडसे यांच्या जीवनातील विविध छटांचे चित्रण करणार्‍या कवितांना ही रसिकांची मनमुराद दाद मिळाली.
सर्व कविंच्या रचनांना सभागृहाने उत्तम दाद दिली.बालाजी मुंडे (किनगाव) यांनी ‘टाहो’ या कवितेत ‘स्त्री-भ्रुण' हत्येसारखा ज्वलंत विषय मांडला.मुंडे आपल्या कवितेत म्हणतात,
“खुप झाले देवा त्या पातक्यांचे लाड,
छळणारे हात आम्हांसी खुब्यातून काढ,
जमतय का ते बघ,नाही तर आंदोलन छेडावे लागेल,
गर्भाशयात डोकावणार्‍या एकेक डोक्याला फोडावे लागेल".
या ओळीतून त्यांनी वास्तवावर प्रहार केला. गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे यांनी आपली नविन रचना सादर केली.,“कोण कोवळ्या सरींमध्ये पेरतो आहे जहर कसा
ऊतू जातात विकार आणीक दुःखालाच बहर कसा
उजेडाचे वारस आपण लढत राहू दिवसरात
आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात
चल येतो का माझ्या सोबत अंधाराचे गाणे गात"
या रचनेतून डॉ.राजपंखे यांनी उजेडाचं नातं सांगत अंधाराशी लढण्यासाठी एल्गार पुकारला.‘काव्यसिंधु' या राज्यस्तरीय पाच कवि संमेलनांचा समारोप प्रख्यात कवी दिनकर जोशी यांच्या सोनीयाचा पिंपळ या कवितेने झाला.जोशी आपल्या कवितेत म्हणतात.,
“सोनीयाचा पिंपळ झडु लागला.
ज्ञान देव समाधीत रडू लागला.
ज्ञानदेवा दुःख झाले असे हे अपार.
वाजविण्या नाही ताटी, मुक्ताई बेजार.
गुहेतच नाथ आता दडु लागला.
ज्ञान देव समाधीत रडू लागला." या कवितेत दिनकर जोशी यांनी ऐतिहासिक संदर्भ देत आजच्या वास्तवाला भिडणारी कविता सादर केली.त्यांच्या कवितेला रसिक-श्रोत्यांनी उत्स्फुर्त दाद दिली. रसिकांनी काव्य सरीता 1 ते 5 या राज्यस्तरीय कवी संमेलनास महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ,
मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आदी विभागातून दिडशेहून अधिक कवि आणि कवयिञी यांनी उपस्थित राहून आपल्या रचनांचे बहारदार सादरीकरण केले.तर रसिक-श्रोत्यांनी सर्वच कवींच्या कवितांना उत्स्फुर्त व भरभरून दाद दिली.काव्यसिंधू राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, संयोजन समितीचे प्रमुख दिनकर जोशी यांचे मार्गदर्शनाखाली विनायक मुंजे,आनंद टाकळकर,सि.व्ही.गायकवाड यांचेसह प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार व परीश्रम घेतले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.