बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त व्याख्यान
अंबाजोगाई (प्रतिनिधी): निजामाने मराठवाड्यात आर्थिक,धार्मिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण केले.राज्य कारभारात जाणिवपुर्वक आपल्या धर्माचे अधिकारी नेमले. शिक्षणाची भाषा उर्दू ठेवली.त्यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ हे मराठवाड्यात येईपर्यंत या भागात शिक्षणाचे मोठे हाल होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात शिकुन आले होते.आणि स्वामीजी यांनी मराठवाडा मुक्तीचा लढा उभा केला होता.या दोन्ही महापुरूषांनी शिक्षणाचा प्रवाह मराठवाड्यात आणला. त्यामुळे मराठवाड्यात अनेक पिढ्या तयार झाल्या.पण,आता आपण स्वामीजी,
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बाबासाहेब परांजपे यांच्या विचारांपासुन मराठवाडा कोसो दूर गेला असल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत प्रा.जयदेव डोळे यांनी व्यक्त केली.ते अंबाजोगाईत आयोजित जाहीर व्याख्यानात बोलत होते.
येथील लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन लातूर यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा.जयदेव डोळे यांच्या जाहिर व्याख्यानाचे सोमवार, दि.28 जानेवारी रोजी
आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी तर विचारमंचावर बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन(लातूर)चे सचिव विजय दबडगांवकर, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.कार्यक्रमाचे स्थानिक संयोजक अशोकराव देशमुख, प्रा.एस.के.जोगदंड, अंकुशराव काळदाते, संभाजीराव लांडे, दिनकर जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना विजय दबडगांवकर यांनी व्याख्यानाच्या आयोजनाबाबतची भूमिका विषद केली. आपल्या व्याख्यानात बोलताना प्रा.जयदेव डोळे यांनी सांगितले की,हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास हा स्पष्ट नाही.एकिकडे मुस्लिम लेखक वेगळा इतिहास लिहितात. निजाम किती योग्य व बरोबर होता.आणि हिंदुनींच मुस्लिमांवर कसे अन्याय अत्याचार केले.हे पुराव्यानिशी दाखवतात.तर दुसरीकडे मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंञ्यसैनिकांच्या मुलाखती व पुस्तकांतून रझाकाराने मराठवाड्यातील जनतेचा कसा आनन्वित छळ केला. रझाकारानेच हैदोस घातला असे सांगितले जाते.इतिहासात एवढी तफावत कशी येेते.याचा अभ्यास गेल्या 70 वर्षांत झाला नाही. निजामाला कोणाची सहानुभूती होती.याचा शोध घ्यायला हवा भारताला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाड्याला स्वातंत्र्यासाठी त्यानंतर एक वर्ष वाट का पहावी लागली.स्वामीजींनी गांधीजींची भेट घेवून निजामाच्या जूलूमशाहीची माहिती दिली होती. रजाकारांच्या अन्यायाविरूद्ध लोक सशस्त्र प्रतिकार सुरू करतील अशी भिती स्वामीजींनी गांधीजींकडे व्यक्त केली.13 सप्टेंबरला बॅ. जिना वारले आणि 17 सप्टेंबरला निजामावर पोलिस अॅक्शनची कारवाई झाली. स्वातंत्र्यानंतर दिवंगत गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण, उद्धवराव पाटील यांनी मराठवाड्याचे भक्कम नेतृत्व केले.आता मराठवाड्यासाठी व इथल्या जनतेसाठी कोणी वाली राहिला नाही.स्वामीजी आणि बाबासाहेब परांजपे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाची लढाई ही स्वातंत्र्याची लढाई मानली.ती लढाई श्रमिकांच्या मुक्तीची होती.तो लढा धार्मिक नव्हता.स्वामीजींच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याने स्वातंत्र्याचा जागर करणारी पिढी निर्माण झाली. चळवळीला पाठींबा देणारे लोक तयार झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा प्रेरणादायी इतिहास मराठी साहित्यात आला नाही. अशी खंत व्यक्त करून मराठवाड्यातील माणसाच्या जगण्याच्या प्रश्नांची नेहमीच उपेक्षा झाली.हे सांगत त्यांनी हैद्राबाद लढ्याचा खरा इतिहास नव्या पिढीसमोर यायला हवा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्वामीजी आणि बाबासाहेब परांजपे यांच्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील कार्याचा सुत्रबद्ध इतिहास लिहिण्याचा प्रकल्प सुरू करायला हवा अशी अपेक्षा ही यावेळी प्रा.जयदेव डोळे यांनी केली.अध्यक्षिय समारोप राजकिशोर मोदी यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार दिनकर जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे स्थानिक संयोजक अशोकराव देशमुख,प्रा.एस.के. जोगदंड,अंकुशराव काळदाते,संभाजीराव लांडे, दिनकर जोशी व अनिकेत लोहिया यांनी पुढाकार घेतला.यावेळी सभागृहात ज्येष्ठ पत्रकार प्रा.नानासाहेब गाठाळ,कॉ.काशिनाथ कापसे,श्री.लातूरे यांच्यासह शहरातील सामाजिक,राजकीय, शैक्षणिक,साहित्यीक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व रोटरीचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.