पत्रकारांना आज विमा संरक्षणाची गरज..! ;सरकार वृत्तपत्र स्वातंत्र्य हिरावून घेतेय-भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णींचा आरोप

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना साथजन्य रोगामुळे मानवी जिवन आज संकटात आहे.या संकटकाळी समाजजागृती करण्याचे काम आणि प्रशासन यांना खरी मदत पत्रकार बांधव रस्त्यावर उतरून करत आहे.मात्र राज्य सरकारची भुमिका ही पत्रकारांच्या विरोधात दिसत असून वर्तमानपत्र छापा. पण,वाटू नका ? यामागे कोणती खेळी आहे.? असा सवाल जेष्ठ पत्रकार तथा भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला.

पत्रकारांचा फायदा घ्यायचा.पण,त्यांना काहीच नको.उलट जेल मध्ये टाका हि निती पञकारांच्या जीवावर बेतणारी असून कोरोनाग्रस्त पत्रकारांना राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाखांचे विमा संरक्षण व सरकारी खर्चाने उपचार करावेत अशी मागणी जेष्ठ पत्रकार तथा भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.याविषयी लक्ष वेधताना त्यांनी म्हटले आहे की,देशात व राज्यात कोरोना संकटाचा शिरकाव झाल्यापासून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ रस्त्यांवर आहे.प्रत्येक क्षणाची आणि घटनेची विस्तृत बातमी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना या जीवघेण्या संकटाबाबत जनजागृती करण्याचे खरे काम सुरूवातीपासूनच पत्रकारांनी केले आहे व ते करीत आहेत.स्वःताच्या जीवाची पर्वा न करता , प्रत्येक ठिकाणी जिल्हा आणि तालुका प्रशासन यांना सहकार्य मोठे झाले आहे.पत्रकार हा वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे.पण,समाज आणि राष्ट्रहितासाठी त्याने कधी ही आपल्या जिवाची पर्वा केलेली नाही.अशावेळी तरी मायबाप सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला हवे.मात्र चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्या प्रमाणे पत्रकारांनाच जेल मध्ये टाकणे,पेपर छापा परंतु,तो वाटप करू नका. अशा प्रकारचा सरकारने काढलेला आदेश म्हणजे पत्रकारीतेची गळचेपी करून तोंड बंद करणे म्हणजे लिखाण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे अशी टिका त्यांनी केली.खरे तर सरकारला प्रत्येक गोष्टीसाठी पत्रकार लागतात ? अगदी घरात बसून लाईव्ह संवाद केला तर त्याच्या मोठ्या बातम्या प्रीन्ट मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियाला आल्या पाहिजेत असा आग्रह सत्ताधाऱ्यांचा असतो.? मग कोरोना लागण झालेल्या किंवा अडचणीत आलेल्या पत्रकार बांधवांसाठी सरकार काहीच का करत नाही.हे दुर्दैव आहे.या उलट सरकारचे अपयश सामान्य लोकांपर्यंत जावू नये म्हणुन पेपर विक्रीवर सरकारने बंदी घातली असा घणाघाती आरोपच प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला.सरकारने पत्रकारांना आर्थिक मदत द्यावी आणि 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.मानवतेच्या दृष्टीकोनातून या वर्गाकडे पाहण्याची गरज आहे. पत्रकार जर लेखणी आणि कॅमेरा बंद करून घरात बसला तर ? हा पण विचार सरकारने करायला हवा. पेपर विक्रीवरचे निर्बंध तात्काळ उठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.