लॉकडाऊनमुळे मुंबई-पुण्यात आडकले मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी ; त्यांना स्वगृही पाठवण्याची व्यवस्था करावी – राम कुलकर्णी

राज्य सरकारने गावाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी-भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना हे महामारीचे संकट सुरू झाल्यापासून जवळपास दोन महिने होत आले आहेत.मराठवाड्यातील मुलं-मुली शिक्षण आणि नोकऱ्यांच्या माध्यमातून मुंबई,पुणे,औरंगाबाद, बेंगलोर,नाशिक आदी मोठ्या शहरात अडकून पडले आहेत.कोटा येथे आडकलेली मुलं गावाकडे पोहचविण्यासाठी ज्याप्रमाणे राज्य सरकारने पाऊले उचलली.त्याचप्रमाणे राज्याच्या विविध जिल्ह्यात आडकलेल्या मुलांना त्यांच्या गावी व घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने व्यवस्था करावी. त्यांना आई-वडीलांजवळ आणून सोडावे अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

निवेदनात भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमधून विशेषता लातूर,बीड,नांदेड,परभणी उस्मानाबाद,हिंगोली आणि औरंगाबाद आदी ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर पुणे,मुंबई, नाशिक,सांगली,सातारा व कोल्हापूर या ठिकाणी मुले आणि मुली शिक्षणासाठी गेलेले आहेत.मार्च महिना हा परीक्षेचा असतो.त्यामुळे बहुतेक मुलं आणि मुली हे ज्या ठिकाणी शिकत होते. त्याच ठिकाणी अडकलेले आहेत.पुणे व मुंबईसारख्या शहरात हजारोंच्या संख्येने मुले आणि मुली अडकलेली आहेत.नुकतेच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालेले.पण,कंपनीत नौकरीला लागलेले असेही असंख्य लोक आज या लॉकडाऊन मुळे अडकून पडले आहेत.22 मार्च पासून लॉकडाऊन देशात सुरू झालं आणि आणि आजतागायत त्या मुला-मुलींना गावाकडे येता आलेले नाही,घरात बसून कोरोना या संकटांची चिंता, आणि बाहेर आपली मुलं आणि मुली कशी असतील यांची चिंता वाटते.अशी अवस्था प्रत्येकाच्या घराघरात आहे.एवढेच नाही तर अनेक मुला-मुलींची उपासमार होत आहे.त्यांचेकडे
खाण्यापिण्यासाठी किराणा साहित्य पण नाही.तर पुणे मुंबई सारख्या शहरात खाणावळी (मेस) बंद आहेत.शासनाने ज्याप्रमाणे राजस्थान मधून कोटा येथील मुला-मुलींना घेऊन येण्यासाठी सोय केली.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात जिल्हा अंतर्गत बाहेरगावी अडकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी आई-वडिलांच्या जवळ आणून सोडण्यासाठी शासनाने वाहनांची सोय व व्यवस्था करावी.तसेच एस.टी.महामंडळामार्फत उपलब्ध करून त्यांना आपल्या गावाकडे घरी पोहोचविण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. वास्तविक पाहता आई-वडीलांसमोर कोरोना या जीवघेण्या रोगापेक्षा या मुलांच्या खाण्यापिण्याची चिंता आहे.एवढेच नव्हे तर नोकरीला लागलेले किंवा छोट्या-मोठ्या कंपनीत काम करणारे सुशिक्षित युवकवर्ग हा मोठ्या प्रमाणावर अडकलेला आहे. त्या मुलांना जिल्हा अंतर्गत प्रशासनाशी संपर्क साधून प्रसंगी त्यांची योग्य ती आरोग्य तपासणी करून आपल्या घरी जर पोहोचले तर अशा या संकटात आई-वडिलांची चिंता संपल्याशिवाय राहणार नाही.त्यांना परत पोहचविण्याची जबाबदारी सरकारची आहे.सरकारने याबाबत तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी मागणी ही राम कुलकर्णी यांनी केली आहे.