सोयगाव,दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
गुजरात(जि.भरूच)येथून उसतोडणी कामांवरून ६५ मजुरांचा जथ्था मंगळवारी रात्री बहुलखेडा(ता.सोयगाव)येताच ग्रामस्थांनी या परराज्यातील मजुरांना रात्रभर शेतात ठेवून बुधवारी पहाटे तपासणी साठी जरंडी प्राथमिक केंद्रात आणले,या मजुरांची कोरोना तपासणी करून त्यांना आरोग्य विभागाने १४ दिवस कोरोटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.त्यामुळे या मजुरांना पुन्हा शेतातच रहिवास करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजमल पवार यांनी दिली.
बहुलखेडा ता.सोयगाव येथून गुजरात जि,भरूच येथे उसतोडणीसाठी गेलेल्या ६५ मजुरांना गुजरात सरकारने महाराष्ट्रात जाण्याची परवानगी दिली होती.त्यानुसार बहुलखेडा ग्रामपंचायतीला प्राप्त सूचनेनुसार सरपंच राजमल पवार,पोलीस पाटील चंद्रसिंग राठोड यांनी मंगळवारी रात्री सतर्क राहून आलेली मजुरांचे वाहने थेट शेतात घेवून त्यांना बुधवारी पहाटे कोरोना तपासणीसाठी जरंडीला आणले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास सोनवणे यांनी या मजुरांची तीनवेळेस तपासणी करून त्यांना १४ दिवस कोरोटाईन राहण्याचा सल्ला दिल्यावरून बहुलखेडा ग्रामपंचायतीने या मजुरांना शेतात वास्तव्यास ठेवण्याचा सल्ला दिला.
अर्धपोटी उपाशी मजुरांना पाणीही मिळाले नाही-
गुजरात ते महाराष्ट्र या प्रवासात या मजुरांना रस्त्यात लॉकडाऊन मध्ये पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही त्यामुळे पोटाची भाकरी तर दूरच दोन दिवसापासून उपाशी राहून त्यांनी वाहनाने प्रवास करून मंगळवारी घर गाठले त्यामुळे तपासणी दरम्यान या मजुरांना कोरोना तर दूरच परंतु आम्हाला खायला कोण देणार असा प्रश्न त्यांच्या मनात होता.परंतु प्रशासनाजवळ मात्र त्यांच्या या प्रश्नाला तूर्तास तरी उत्तर नव्हते.सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांचेसह पोलिसांनी जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात या गुजरात वरून आलेल्या मजुरांची भेट घेवून त्यांना काळजी घ्यावी व १४ दिवस घराबाहेर पडू नका असे आवाहन केले.परतू त्यांच्या उदरनिर्वाहाबाबत कोणीही मार्ग काढलेला नव्हता त्यामुळे बुधवारचा दिवसही त्यांचा उपासमारीचा दिवस ठरला होता.