पंकजाताई पालवेंनी शेतक-यांचे पैसे द्यावेत – कालिदास आपेट याची मागणी

अंबाजोगाई दि.०५- बीडच्या पालकमंत्री पंकजाताई पालवे यांनी वैद्यनाथ,अंबाजोगाई,पन्नंगेश्वर साखर कारखान्याला सन २०१८-१९ च्या गाळप हंगामात घातलेल्या ऊसाच्या FRP ची रक्कम आणि बीड जिल्हा मध्यवर्ती बॅकेतील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचे पैसे तातडीने द्यावेत अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली.
ऊस गाळपाला घातल्यानंतर १४ दिवसात FRP ची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. वैद्यनाथ,अंबाजोगाई सहकारी साखर कारखाने तसेच पन्नंगेश्वर हा त्यांचा खाजगी साखर कारखाना सुरु होवून जवळपास ९० दिवस उलटले आहेत.मात्र शेतक-यांना अजूनही FRP ची रक्कम दिलेली नाही.राज्य सरकारमधील वजनदार मंत्रीच कायदे मोडीत असल्याने इतर साखर कारखान्यांनीही पैसे दिले नाहीत.

बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ, अंबाजोगाईसह सुंदरराव सोळंके, छत्रपती, जयमहेश, जयभवानी,येडेश्वरीआदि.साखर कारखान्यांनी यावर्षी सुमारे ३० लाख टनाचे गाळप केले असून शेतक-यांचे सुमारे ६०० कोटी रुपये थकविले आहेत.
शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या शेतकरी संपानंतर देवेंद्र सरकारने ३४ हजार कोटीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहिर केली.त्याअंतर्गत बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला ३६४ कोटी रुपये मिळाले मात्र बॅकेच्या संचालक मंडळ आणि कार्यकारी अधिका-यांनी ही रक्कम शेतक-यांना वाटप केली नाही.पीक विमा नुकसान भरपाई,घरकुल,संडास,कापूस बोंडअळी, दुष्काळी अनुदानाच्या रकमाही बॅक अधिका-यांनी परस्पर कर्जखाती कापून खाते होल्ड केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
दुष्काळी परिस्थितीत पालकमंत्री पंकजाताई पालवेंनी ऊसाच्या FRP ची थकित रक्कम आणि बीड जिल्हा मध्यवर्ती बॅकेतील शेतक-यांच्या हक्काचे पैसे तातडीने देवुन कायद्याचे पालन करावे.असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केले आहे.

कालिदास आपेट
कार्याध्यक्ष,शेतकरी संघटना,म.रा.
09822061795

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *